आता मोटारीमध्ये मास्क वापरण्याची आवश्यकता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:23+5:302021-01-23T04:10:23+5:30
पुणे : शहरातील कौटुंबिक वापराच्या मोटारींमधून प्रवास करणा-यांना आता मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. पालिकेने हा नियम शिथिल केला असून ...
पुणे : शहरातील कौटुंबिक वापराच्या मोटारींमधून प्रवास करणा-यांना आता मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. पालिकेने हा नियम शिथिल केला असून केवळ प्रवासी वाहतूक करणा-या मोटारींमध्येच मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची घटलेली संख्या लक्षात नागरिकांकडून ही मागणी केली जात होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाच्या निर्देशांनुसार, विनामास्क फिरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालिका आणि पोलिसांकडून एकत्रितपणे ही कारवाई केली जात असून आतापर्यंत दहा कोटींपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. दुचाकी चालक, चारचाकी चालक, तीन चाकी आणि पादचा-यांवर कारवाई होत आहे. या कारवाईला विरोध नसला तरी कारवाईमधून मोटारीला वगळावे, अशी मागणी नागरिकांनी केलेली होती.
एकीकडे शहरात वडापाव, पाणीपुरी, चाटच्या गाड्यांसह चहाच्या टप-यांवर विनामास्क गर्दी होत आहे. रेस्टॉरंट, हॉटेल आणि बारमध्ये मास्क काढूनच शेकडो नागरिक खात-पित असतात. याठिकाणी मास्क नसलेला चालतो; तर मग बंदिस्त चारचाकीमधून जाणा-या नागरिकांवरच मास्कची कारवाई का केली जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करू लागले होते. पोलिसांच्या झुंडीच्या झुंडी गाड्या अडवून दंडाची वसुली करीत असल्याने शासनाला तिजोरी भरण्यासाठी नवे रेव्हेन्यू मॉडेल सापडल्याची टीकाही होऊ लागली होती.
====
एकाच कुटुंबातील व्यक्ती जर खासगी मोटारीमधून प्रवास करीत असतील तर त्यांनी मास्क लावणे अनिवार्य नाही. परंतु, प्रवासी वाहतूक करणा-या मोटारी, ओला-उबेरसारख्या मोटारींमधून प्रवास करीत असताना चालकासह सर्वांनी मास्क लावणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठकीमध्ये चर्चा झाली. नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. - मुरलीधर मोहोळ, महापौर