"भाजपाकडून ना ऑफर, ना ED ची धमकी"; राजकीय प्रवेशाबाबत मोरेंचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 03:13 PM2024-03-12T15:13:46+5:302024-03-12T15:14:52+5:30
आगामी निवडणुकांत जर लोकसभा लढवायची ठरवली तर मी एकटा लढणार, माझ्या घरातील मी पहिला राजकारणी, कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे आलो नाही
पुणे - गेल्या अनेक महिन्यांपासून मनसेत घुसमट होत असलेल्या पुण्यातील मनसेच्या वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राम राम करत राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला. वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी देत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, पक्षाच्या कोअर कमिटीवर थेट आरोप करत पुढील राजकीय भूमिकेवरही भाष्य केलं. मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. यापुढे मी काय करायचे हे पुणेकर ठरवतील, असे मोरेंनी म्हटले. तर, अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर आहेत, पण भाजपाकडून कुठलीही ऑफर नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकांत जर लोकसभा लढवायची ठरवली तर मी एकटा लढणार, माझ्या घरातील मी पहिला राजकारणी, कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे आलो नाही. राजसाहेबांच्या हृदयात मी स्थान निर्माण केले, पण ते डळमळीत करण्याचं काम पुणे कोअर कमिटी करतेय, असा आरोप करत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, मला अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर्स आहेत, पण भाजपाकडून कुठलीही ऑफर नसल्याचं मोरेंनी स्पष्ट केलं. मात्र, मला खासदार व्हायचं आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले. त्यामुळे, वसंत मोरे नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढतात हे पाहावे लागेल.
मला यापूर्वीच अनेक पक्षांकडून ऑफर्स होत्या, मला शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून ऑफर होत्या. तर, भाजपाकडून कुठलीही ऑफर नाही. तसेच, ईडी किंवा सीबीआयकडून धमक्याही मिळाल्या नाहीत, माझ्याकडे आहेच काय, असा मिश्कील सवालही मोरेंनी केला. तर, जे आहे ते मी माझ्या स्वबळावर कमावलेलं आहे, असेही मोरेंनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शरद पवारांची भेट कात्रजमधील कामासाठी
मी शरद पवारांची भेट घेतली, ती कात्रज मतदारसंघातील कामासाठी घेतली होती. ती कुठलीही राजकीय भूमिका नव्हती. गेल्या २-३ वर्षापासून माझ्यावर अन्याय सुरू होता. वारंवार माझ्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे केले. मी संघटना वाढीसाठी प्रयत्न केलेत. सामान्य महाराष्ट्र सैनिकांनाही विचारलं तर ते सांगतील. पण काहींना संघटना मजबूत करायची नाही. निवडणूक लढवायची नाही. पुणे शहरात मनसेची ताकद नाही. निवडणूक लढण्यासारखे वातावरण नाही असा चुकीचा अहवाल दिला. कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायची होती परंतु नेत्यांनी चुकीचा अहवाल दिला असा आरोप वसंत मोरे यांनी केला.