Video : बारामतीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ, भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 05:40 PM2019-09-14T17:40:34+5:302019-09-14T20:56:54+5:30
भाजपच्या बारामती येथील महाजादेशयात्रे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात व्यत्यय आणू बघणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलेच फटकारले.
पुणे : भाजपच्या बारामती येथील महाजनादेशयात्रे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात व्यत्यय आणू बघणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलेच फटकारले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषणावेळी राष्ट्रवादीला उत्तर दिलं. कोणी कितीही प्रयत्न केला तरी आमचा आवाज बंद करू शकणार नाही अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आणि भाषण सुरु ठेवले.
भाजपच्या निवडणूकपूर्व महाजनादेश यात्रेने आज पुणे जिल्ह्यातील बारामतीचा टप्पा पूर्ण केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या या यात्रेत शनिवारी बारामती शहरातील तीन हत्ती चौकात सभा घेण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे कारण देत या चौकात स्पीकर लावण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र भाजपची सभा त्याच चौकात स्पीकरवर मोठ्या आवाजात सुरु असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सभेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. जर दहीहंडी आणि गणेशोत्सवात स्पीकर नाही तर भाजपला परवानगी कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अखेर पोलीस आणि भाजप पदाधिकारी यांनी मध्यस्थी करून बॅनर व डीजे सिस्टीम उतरवली. दरम्यान आपल्या भाषणामध्ये हाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने महाजनादेश यात्रेचा धसका घेतला आहे. माझी साऊंड सिस्टीम मी सोबत घेऊनच फिरतो. आमचा आवाज कोणी बंद करू शकत नाही’ असे प्रत्युत्तर दिले.त्यानंतर त्यांची यात्रा पुणे शहरात दाखल झाली आहे.