कोणी मागणी केल्याने चौकशी होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:19+5:302021-06-26T04:09:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी धाड टाकली. तत्पूर्वी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवारांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला. कोणी मागणी केल्याने अशी कोणाची चौकशी होत नसते, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येथे दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. संबंधित तपास यंत्रणा आपले काम करत आहेत. पण, यात कोणी काहीही मागणी केली तरी सीबीआय चौकशी होत नसते. यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल."
भाजपच्या मागणीवर वळसे-पाटील यांनी संताप व्यक्त केला. गृहमंत्री म्हणाले, "चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. प्रत्यक्षात कोरोनाची परिस्थिती असताना सर्वांचे लक्ष त्यावर असायला हवे.’’ तपासाबद्दल बोलायचे झाल्यास मी याबाबत जास्त बोलू इच्छित नसल्याचे स्पष्ट केले.
------
अजित पवारांची अनुपस्थितीची चर्चा
कोरोनाच्या आढावा बैठकीला अजित पवार गैरहजर होते. यामुळेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला पालकमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारीच वाझे प्रकरणात अजित पवार यांची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि अजित पवार यांची जवळीक असल्याचा राजकीय चर्चा होत आहेत. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.