पदवीधर-शिक्षक मतदारसंघांत पहिली पसंती कोणालाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:32 AM2020-12-04T04:32:50+5:302020-12-04T04:32:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदारसंघांतील वैध व अवैध मते निश्चित करण्याचेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदारसंघांतील वैध व अवैध मते निश्चित करण्याचेच काम रात्री दहापर्यंत संपले नव्हते. वैध-अवैध मते निश्चित करतानाच पहिल्या पसंती क्रमांकाची मते मोजली जात होती. मात्र,यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना महाआघाडी किंवा भारतीय जनता पक्ष या दोन्हीसह कोणत्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मतमोजणीस विलंब लागणार असून ‘पदवीधर’चा निकाल शुक्रवारचा दिवस उजाडल्यानंतरही लागेल की नाही याबद्दल साशंकता आहे. ‘शिक्षक’चा निकालही मध्यरात्रीनंतर खूप उशिरा लागण्याची चिन्हे आहेत.
वैध आणि अवैध मतांची विभागणी करताना मात्र दोन्ही मतदारसंघांत ‘महाआघाडी’च्या उमेदवारांनी आघाडी घेतली असल्याचे दिसत होते. पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. ३) पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीत सुरू झाली.
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या पसंतीचे मत दिलेल्या मतपत्रिकांची निवड करण्यात आली. पदवीधर मतदार संघात ११२ टेबल लावण्यात आले. एका टेबलवर बावीसशे मतपत्रिका देण्यात आल्या असून रात्री नऊपर्यंत प्रत्येक टेबलवर सुमारे ८०० ते ९०० मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यानंतरही काही टेबलवर मतपत्रिका वैध, अवैध व पहिला पसंती क्रमांक ठरवणे शिल्लक आहे.
----------
चौकट
शिक्षक मतदारसंघात ‘महाआघाडी’ची आघाडी
शिक्षक मतदारसंघातील ७०-८० टक्क्यांपेक्षा अधिक मतपत्रिका वैध, अवैध व पहिल्या पसंती क्रमांकाची प्रक्रिया रात्री साडेनऊच्या सुमारास पूर्ण होत आली. यात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये पुढे असल्याचा कल दिसून आला. माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांनी देखील चांगली मते घेतली आहेत. मते बाद होण्याचे प्रमाणही अधिक आहे.
---------
कोटा निश्चित होण्यास उशीर
पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणी प्रक्रियेमध्ये वैध मतांची संख्या निश्चित झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या मतांचा ‘कोटा’ निश्चित होणार आहे. शिक्षक मतदारसंघांत ५२ हजार ९७८ मतदान झाले. यात अवैध मतांची संख्या सुमारे तीन ते चार टक्के आहे. त्यामुळे सुमारे ५० हजार वैध मतांची संख्या लक्षात घेता शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीसाठी २५ हजारांपेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, कोटा निश्चित होण्यास मध्यरात्र उजाडली.
चौकट
शिक्षक, पदवीधर मतदान ‘चुकले’
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात मतदान करताना सुमारे तीन ते चार टक्के मतपत्रिका चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याने बाद ठरल्या. माध्यमिक शिक्षक, पदवीधर मतदार असूनही या मतदारांनी मतदान करताना पसंतीक्रम लिहिण्याऐवजी उमेदवाराचा अनुक्रमांक मतपत्रिकेवर टाकला आहे. मतदानासाठी आयोगाने दिलेला पेन वापरण्याऐवजी स्वतःच्या पेनाचा वापर केला. पसंती क्रमांकाऐवजी बरोबरची खूण केली. मतपत्रिकेतील मोकळ्या रकान्यांत पसंती क्रमांक लिहिण्याऐवजी उमेदवाराच्या नावावरच क्रमांक लिहिणे, एकच क्रमांक अनेक जणांना देणे अशा अनेक चुका केल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानात तीन टक्के शिक्षक, पदवीधर नापास झाले आहेत.