ऐतिहासिक! यंदाचा पुरुषोत्तम करंडक कोणालाच नाही; स्पर्धेस पात्र एकही एकांकिका नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 11:39 PM2022-09-18T23:39:11+5:302022-09-18T23:39:34+5:30
सांघिक प्रथम पुरुषोत्तम करंडक कोणालाही कोणालाही देण्यात आला नसून रोख परितोषीक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या कलीगमन या एकांकिकेस देण्यात येत आहे.
पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या पुरुषोत्तम करंडकास पात्र एकही एकांकिका नसल्याने यंदाचा करंडक कोणालाही देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार आणि रविवारी या दोन दिवसात पार पडली. अंतिम फेरीत नऊ महाविद्यालयांच्या संघाची निवड करण्यात आली होती. पण यंदाच्या अंतिम फेरीत चुरशीची लढत पाहायला मिळाली नाही. त्यामुळे स्पर्धेच्या परीक्षकांनी कोणत्याच महाविद्यालयाला पुरुषोत्तम जयराम करंडक न दिल्याचे निकालात सांगितले आहे.
सांघिक प्रथम पुरुषोत्तम करंडक कोणालाही कोणालाही देण्यात आला नसून रोख परितोषीक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या कलीगमन या एकांकिकेस देण्यात येत आहे. सांघिक द्वितीय हरी विनायक करंडक बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या भु - भु एकांकिकेस देण्यात येत आहे. तर सांघिक तृतीय संजीव करंडक मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या गाभारा या एकांकिकेला देण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका म्हणून देण्यात येणारा जयराम करंडक यंदा कोणालाही देण्यात आलेला नाही.
परेश मोकाशी, हिमांशू स्मार्त आणि पौर्णिमा मनोहे यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले.
अंतिम फेरीत या संघांचे सादरीकरण झाले
शनिवारी फर्ग्युसन महाविद्यालय (आद्य), मॉर्डन कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय (गाभारा) आणि मॉर्डन महाविद्यालय, गणेशखिंड (अहो, ऐकताय ना?) हे संघ सादरीकरण झाले. तर रविवारी सकाळी ९ ते दुपारी 12 यावेळेत टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (काय झाडी, काय डोंगार, काय हाटील), कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय (चाराणे) आणि पीआयसीटी महाविद्यालय (कलिगमन) या महाविद्यालयांचे संघ सादरीकरण करतील. याच दिवशी सायंकाळी पाच ते रात्री आठ यावेळेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती (भू भू), डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी (एक्सपायरी डेट)आणि अभियांत्रिकी महाविद्यालय (ओंजळभर चंद्र) या महाविद्यालयांच्या संघांचे सादरीकरण झाले.