'माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत', नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅल बाॅम्बने उडवून देण्याचा ई-मेल
By नितीश गोवंडे | Updated: August 19, 2024 16:03 IST2024-08-19T16:03:27+5:302024-08-19T16:03:54+5:30
पाेलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असून, धमकीचा मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे

'माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत', नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅल बाॅम्बने उडवून देण्याचा ई-मेल
पुणे: विमान नगर परिसरातील फिनिक्स मार्केट सिटी माॅलमध्ये बाॅम्बस्फोट घडवून देण्याची धमकी देणाऱ्या ईमेल आल्याने घबराट उडाली. याप्रकरणी विमान नगर पोलिसांनी धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला.
आदित्य राजेश शितोळे (३०, रा. सोपाननगर, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शितोळे फिनिक्स माॅलमध्ये व्यवस्थापक आहेत. शनिवारी (दि. १७) दुपारी शितोळे यांनी माॅलमधील वरिष्ठ व्यवस्थापक संदीप सिंग यांना आलेल्या ई-मेलची पाहणी केली. तेव्हा फिनिक्स माॅलमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल माॅल प्रशासनाला पाठवण्यात आल्याचे उघडकीस आले. हिडनस बोन नावाच्या व्यक्तीने हा मेल पाठवला आहे. त्यानंतर माॅल प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
बाॅम्बशाेधक नाशक पथकाने (बीडीडीएस) माॅलची तपासणी केली. तेव्हा माॅलमध्ये बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. ‘मी आयुष्याला कंटाळलो आहे. माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत. पोगो आणि नोरो मला त्रास देत आहेत,’ असे ईमेलमध्ये म्हटले होते. पाेलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असून, धमकीचा मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जी. बी. होळकर करत आहेत.