"शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये", मुख्यमंत्र्यांनी साधला पुण्यातील शिक्षकांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 10:12 AM2022-09-06T10:12:45+5:302022-09-06T10:12:58+5:30
एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासनही दिले
पुणे : शिक्षकदिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील शिक्षकांसोबत संवाद साधला. या वेळी त्यांनी शिक्षकांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासनही दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या संवादाचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, शिक्षणाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांनी शहर आणि ग्रामीण परिसरातील शिक्षणाची दरी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. दिव्यांगाच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणीही केली. मुख्यमंत्र्यांनी हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या, तसेच कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
प्रशिक्षण फायदेशीर ठरणार
जिल्हाधिकारी डाॅ. देशमुख म्हणाले, ‘समाजासाठी आणि देशासाठी शिक्षकाचा हातभार फार मोलाचा आहे. कोरोना काळात शिक्षणव्यवस्था अडचणीत आली होती. तरीदेखील ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. आंतरजिल्हा बदलीसाठी राज्य सरकारने नवीन धोरण आखले आहे. यामुळे शिक्षकांना बदली होताना फायदेशीर ठरणार आहे. शाळा समितीच्या सदस्यांना सुरू करण्यात आलेले प्रशिक्षण फायदेशीर ठरणार आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये गुणवत्ता निर्माण होईल असा विश्वास आहे.
''शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. गरिबीमुळे शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री''