देवेंद्र फडणवीस यांना कोणीही अडकवत नाहीये ;विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 08:53 PM2020-02-20T20:53:42+5:302020-02-20T20:56:19+5:30
,केंद्रात व राज्यात भाजपची पाच वर्षे सत्ता होती. त्यावेळी हा तपास एनआयएकडे का दिला नाही. पाच वर्षे हे काय झोपले होते का? अशा शब्दात बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली.
पुणे : एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आला. मात्र,केंद्रात व राज्यात भाजपची पाच वर्षे सत्ता होती. त्यावेळी हा तपास एनआयएकडे का दिला नाही. पाच वर्षे हे काय झोपले होते का? अशा शब्दात बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. तसेच ज्यावेळी एसआयटी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी महाराष्ट्रातील एका ‘नारदाने’दिल्लीत जाऊन याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आम्ही त्या ‘नारदा’चा शोध घेत आहोत, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
सारथी संस्थेला भेट दिल्यानंतर वडेट्टीवार यांनी गुरुवारी (दि. २०) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की कोरेगाव भीमा मधील दंगलीच्या चौकशीला योग्य दिशा देण्याचे काम केले जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून 26/11 ची फेर चौकशी करा, अशी मागणी केली जात आहे. मात्र,भाजप नेहमीच अशी सोईची व दुट्टी भूमिका घेत असते. त्याला काही अर्थ नाही.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा मंत्र्यांना ‘क्लिन चिट’ दिली. खरे तर त्यांची नि:पक्षपातीपणे चौकशी होणे गरजेचे होते. पण,चौकशी करायचीच नाही,अशी भूमिका मागील सरकारने घेतली होती. आमच्या सरकारने आरोप असणा-या माजी मंत्र्यांच्या चौकशीचा निर्णय घेतला असल्याने संबंधितांना चौकशीला सामोरे जावे लागेल.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न कोणीही करत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी सांगितले, की फडणवीस यांच्यासह सर्वांसाठी कायदा समान आहे. कोणाचेही तोंड पाहून कायदा काम करत नाही. मात्र,कायद्यापेक्षा कोणी स्वत:ला मोठे समजत असेल तर तो कायद्याला मानत नाही,असा त्याचा अर्थ निघतो. खरी- खोटी बाब न्यायालयात समोर येईल. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना काही गोष्टी लपविल्या गेल्या असतील तर त्या तपासण्याचा अधिकार न्यायालयाला आहे.
मशीद उभारणीसाठी हवा ट्रस्ट ; विजय वडेट्टीवार
‘‘राम मंदीर बांधण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. परंतु,मशीद उभारणीसाठीसुध्दा ट्रस्ट स्थापन झाला पाहिजे. देश सर्व जाती धर्मांचा आहे. देशातील धार्मिक तेढ संपवून राजकारण केले पाहिजे. परंतु, मोदी सरकारकडून याबाबत अपेक्षा करता येत नाही.’’