तीन तास कोणी फिरकलेच नाही अन् नातेवाईकांशिवाय तो जळाला बेवारसच-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:09 AM2021-04-11T04:09:41+5:302021-04-11T04:09:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: ससूनमधील कोरोना रूग्ण कक्षात त्याने रात्री ८ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्याच्या नातेवाइकांना तसे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ससूनमधील कोरोना रूग्ण कक्षात त्याने रात्री ८ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्याच्या नातेवाइकांना तसे कळवण्यात आले. स्मशानभूमी कोणती ते सांगण्यात आले. अडीच तास वाट पाहूनही अखेर कोणीच न आल्याने कर्मचाऱ्यांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
गेल्या महिनाभरातील हा दुसरा प्रकार. कोरोनाने जनमानसावर इतकी दहशत बसवली आहे की, आता नातेवाईक निकटच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणेही टाळू लागले आहेत. सांगून कळवूनही कोणी येत नाहीत. शनिवारी मृत्यूमुखी पडलेला प्रशांत (नाव बदलले आहे) गरीब मुलगा होता. त्याआधीही एका वयस्कर व्यक्तीवर असेच त्यांच्या नातेवाईकांच्या गैरहजेरीत कर्मचाऱ्यांनाच अंत्यसंस्कार करावे लागले.
नेहमीच्या वैकुंठ स्मशानभूमीत कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला काही स्वयंसेवी संस्थांनी हरकत घेतली. शहराच्या मध्यवर्ती भागात ही स्मशानभूमी असल्याने तिथे नको असा त्यांचा मुद्दा होता. तो मान्य झाला. मात्र त्यामुळे आता कोरोना मृतदेहावर अंतिम संस्कार कुठे करायचे याबद्दल निवडीचे काहीच स्वातंत्र्य राहिलेले नाही. जागा असेल तिथे हे त्याचे उत्तर झाले आहे.