कुणी कितीही मोठ्या बापाचा असला तरी सोडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:11 AM2021-07-26T04:11:02+5:302021-07-26T04:11:02+5:30
बारामती : ‘चुकीचं कुणी वागायचं नाही, कुठे बेकायदेशीर अवैध व्यवसाय, कुठे सावकारीचा धंदा, कुठे शेकड्याने पैशाचा धंदा असेल ...
बारामती : ‘चुकीचं कुणी वागायचं नाही, कुठे बेकायदेशीर अवैध व्यवसाय, कुठे सावकारीचा धंदा, कुठे शेकड्याने पैशाचा धंदा असेल ना त्यांना मी सोडणार नाही. कुणी कितीही मोठ्या बापाचा असला तरी अजिबात सोडणार नाही त्याच्यावर मोक्का लावला जाईल, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खाजगी सावकारांना दिला. तसेच मी उपमुख्यमंत्री वसुली करण्यासाठी बनलोय का? असा सवालच करत अजितदादांनी कार्यकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
बारामती येथील एका कार्यक्रमामध्ये पवार बोलत होते. मध्यंतरी खासगी सावकारकीच्या घटनांमुळे बारामतीमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते. तसेच या प्रकरणामधून एका व्यापाऱ्याला आत्महत्या देखील करावी लागली होती. आता देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी खासगी सावकारांना दम भरल्यामुळे खासगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत. ते म्हणाले, चांगल्या सवयी लावा. जर कुणी वाईट मार्गाला लागलं तर सोडणार नाही. आपली मुले इथे लहानाची मोठी होत असतात. त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार पडले पाहिजे. हे सगळं करत असताना चुकीचे कुणी वागले, कुठे अवैध धंदा, कुठे सावकारीचा धंदा, शेकड्याने पैशाचा व्यवहार करत असेल तर त्यांना मात्र सोडणार नाही. कितीही मोठ्या बापाचा असला तर त्याला मोक्का लावीन. त्यांना वाटलं तर तडीपार करीन. त्यांच्या बगलबच्चांनासुद्धा हे सांगून ठेवा, असा सज्जड दमच अजितदादांनी कार्यकर्त्यांना भरला. तसेच, वेडीवाकडी कामे करू नका, वाईट सवयी असलेल्या लोकांच्या नादी लागू नका, हे मला स्पष्ट सांगायचंय. नाहीतर दादा, यांनी माझी पैसे बुडवले, असं सांगत येता. उपमुख्यमंत्री वसुली करण्यासाठी बनलोय का? असा सवालच विचारत अजितदादांनी कार्यकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले.