इंदापूरात बाहेरील उमेदवार नको; पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध, कार्यकर्त्यांचे पवारांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 05:45 PM2024-09-29T17:45:14+5:302024-09-29T17:45:41+5:30
उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल, त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही
बारामती: विधानसभेसाठी इच्छुक असणार्या राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्यासह गोविंदबाग निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. पक्षातील इच्छुकांचाच उमेदवारीसाठी विचार व्हावा, बाहेरील नेत्यांचा विचार करु नये, असे साकडे देखील या नेत्यांनी ज्येष्ठ नेते पवार यांना घातले. तसेच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यावर पवार पक्षातील उमेदवार ठरवताना इच्छुकांना विचारून नव्हे, तर कार्यकर्त्यांना विचारूनच उमेदवारी बाबतचा निर्णय घेतला जाईल,असे सांगत पवार यांनी उपस्थितांना आश्वासित केले.
रविवारी (दि २९) सकाळी आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने , दशरथ माने, भरत शहा,अमोल भिसे,अॅड तेजसिंह पाटील, सागर मिसाळ, महारुद्र पाटील, अशोक घोगरे, पक्षाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, तेजस पाटील, छाया पडसाळकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या ठीकाणी पोहचले.यावेळी अॅड.पाटील,दशरथ माने,जगदाळे आदींनी त्यांचे मत व्यक्त केले. विधानसभेसाठी पक्षाच्या सहाजणांनी उमेदवारी मागितली आहे.या पार्श्वभुमीवर या पदाधिकार्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या सहापैकी एकाचाच विचार व्हावा,बाहेरील उमेदवार नको,अशी आग्रहाची विनंती आहे.हे सर्व उमेदवार सक्षम आहेत.त्यामुळे सहापैकी संधी दिलेल्या त्या उमेदवाराला निवडुन आणण्यासाठी एकीने प्रयत्न करु,इंदापुर तालुक्याला सक्षम पर्याय द्या,अशी या सर्वांनी मागणी केली.
त्यावर ज्येष्ठ नेते पवार म्हणाले, पक्षातील उमेदवार ठरवताना इच्छुकांना विचारून नव्हे, तर संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारूनच उमेदवारी बाबतचा निर्णय घेतला जाईल. उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल. त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही. होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आशादायक चित्र आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने जागांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संजय राऊत, नाना पटोले व जयंत पाटील यांना अधिकार दिलेले आहेत, हे जागावाटप झाल्यानंतर आपल्या पक्षातील उमेदवारी बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. पंतप्रधान लोकसभेच्या वर त्यांच्या चारशे जागा येतील असे सांगत होते. मात्र राज्यातील जनतेचा सुर वेगळा असल्याचे जाणवले. त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करता आले नाही. आज महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. यंदा आम्ही दहा जागा लोकसभेच्या लढविल्या, त्यातील आठ जागांवर विजय मिळाला. यंदा लोकांनीच बदल करायचा निर्णय घेतला होता. नेत्यांनी काही सांगितले तरी लोकांनी त्यांना जे योग्य वाटले तो निर्णय घेतला. बारामतीतही अनेक नेत्यांनी भाषणे केली, पण तुम्हीच ठरवलेले होते, दीड लाखांहून अधिक मताधिक्याने आपला उमेदवार विजयी झाल्याचे पवार म्हणाले.
महाविकास आघाडी तीन पक्षांची आहे, प्रत्येक तालुक्यात सर्वेक्षण होईल, इच्छुकांना नाही तर कार्यकर्त्यांना विचारुन मगच निर्णय घेतला जाईल, आगामी दहा दिवसात हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. इंदापूरच्या बाबतीतही सर्वांशी विचारविनिमय करुन मगच निर्णय घेतला जाईल. यंदा इंदापूरमध्ये बदल घडेल अस वातावरण आहे, त्या मुळे निवडून येण्याची क्षमता विचारात घेत सर्वांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ, काही झाले तरी यंंदा राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास पवार यांंनी यावेळी व्यक्त केला.
आघाडी म्हणून लढणार असल्याने काही जागा मित्रपक्षांना द्याव्या लागणार आहेत. निवडणूकीत त्यांचेही काम करावे लागणार आहे. तुम्हाला तुमचे म्हणणे मांडायचा अधिकार आहे. पण इंदापूरचा पुढचा आमदार आपलाच असेल हे लक्षात घेत सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन शरद पवार यांनी इंदापूरच्या कार्यकर्त्यांना केले.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते हर्षवर्धन पाटील इंदापूरातून तिकीट मिळण्यासाठी तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे. परंतु पाटील यांच्या उमेदवारीला शरद पवार गटातूनच मोठा विरोध सुरु आहे. रविवारी(दि २९) गाेविंदबाग येथे नेते पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी हा विरोध नोंदविला. इंदापुरातील सर्व नेत्यांंनी विरोध केल्याने भाजप नेते हर्शवर्धन पाटील यांची पक्षातील वाट खडतर होणार असल्याचे संकेत आहेत.
काही लोकांना आभाळाकडे बघून पाऊस पडेल की नाही ते समजते, आता अनेकांना वाटू लागले आहे की पाऊस पडेल त्या मुळे आपल्याकडील गर्दी वाढू लागली आहे. राज्यात कुठही गेलो,दररोज सकाळी तरी हजारोंच्या संख्येने लोक जमतात, लोकांनीच या निवडणूकीत जिंकायच ठरवले आहे, त्यामुळे यंदा चांगले निकाल लागतील यात शंका नाही,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडुकीबाबत विश्वास व्यक्त केला.