पोलीस ठाण्यांमध्ये नाही पार्किंगची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:36+5:302021-03-10T04:13:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशातील सर्वाधिक दुचाकीचे शहर म्हणून नावाजलेल्या पुणे शहरात सध्या सर्वत्रच पार्किंगची मोठी समस्या निर्माण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील सर्वाधिक दुचाकीचे शहर म्हणून नावाजलेल्या पुणे शहरात सध्या सर्वत्रच पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्याला पोलीस ठाणीही अपवाद राहिलेली नाही. विशेषत: पेठ्यांमध्ये असलेल्या जुन्या पोलीस ठाण्यांमध्ये पार्किंगची सुविधाच नसल्याने पोलिसांच्या गाड्यासह पोलीस कर्मचारी, पोलीस ठाण्यात येणार्या नागरिकांना आपली वाहने रस्त्यावरच पार्क करावी लागत आहे.
बंडगार्डन, खडक पोलीस ठाण्यात पार्किंगची सोय नसल्याने वाहने रस्त्यावर लावावी लागतात. शिवाजी रोडवर खडक पोलीस ठाणे हे शहरातील सर्वात जुन्या पोलीस ठाण्यापैकी एक पोलीस ठाणे आहे. तेथे आतमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने सर्व गाड्या शिवाजी रोडवरच लागतात. बंडगार्डन पोलीस ठाण्यात फक्त दोन ते तीन पोलीस वाहने लागू शकतील इतकी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे इतर सर्व वाहने बाहेरच असतात.
फरासखाना हे शहरातील पोलीस दलाची सर्वात जुनी इमारत आहे. या ठिकाणी सुरुवातीला पार्किंगला जागा होती. पण काळाच्या ओघात येथे वाहतूक शाखेचा एक विभाग सुरु झाला. दोन पोलीस ठाणी, २ सहायक आयुक्त, एक पोलीस उपायुक्त, अपर पोलीस आयुक्त यांची कार्यालये असल्याने या इमारतीत प्रत्यक्ष काम करणार्या पोलिसांची संख्या अधिक आहे. त्यात तेथे येणारे पोलीस अधिकारी, त्यांच्या गाड्या यामुळे बाहेरुन येणार्यांना आता येथे पार्किगसाठी जागाच शिल्लक नसते. पोलिसांनाही येथे त्यांची दुचाकी लावायला जागा मिळत नाही. त्यात वाहतूक शाखेने पकडून आणलेल्या वाहनांची त्यात भर पडते.
शहरातील नव्याने तयार करण्यात आलेल्या कोरेगाव पार्क, कोथरुड येथे पार्किंगसाठी चांगली जागा आहे. अन्य पोलीस ठाण्यांमध्येही कमी जास्त पार्किगची सुविधा आहे. मात्र, वाढत्या वाहनसंख्येमुळे सर्वच ठिकाणी असलेले पार्किंग पुरेसे ठरु शकत नाही. केवळ पोलीस ठाणेच नाही तर सर्वच शासकीय इमारती व अन्य व्यावसायिक ठिकाणी ही समस्या दिसून येत आहे.
शहर पोलीस दलाकडे साडे सातशे वाहने
शहर पोलीस दलातील ३० पोलीस ठाणी, वेगवेगळी सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांची कार्यालये तसेच गुन्हे शाखेची युनिट अशा सर्व पोलीस दलाच्या विविध विभागाकडे मिळून साडेसातशे वाहने सध्या बंदोबस्त, तसेच गस्तीसाठी वापरली जातात. त्यामध्ये ४३३ चारचाकी वाहने असून ३१८ दुचाकी वाहने आहेत. याशिवाय पोलीस कर्मचार्यांची वैयक्तिक वाहनेही असतात.
शहरात ३० पोलीस ठाणी असून ३६३ पोलीस अधिकारी आणि ८ हजार ४०० पोलीस कर्मचारी आहे. यासर्वांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था अपुरी पडत आहे.