संस्था, संघटनांना पे पार्किंग नको; दर्शवला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 03:16 AM2018-03-23T03:16:08+5:302018-03-23T03:16:08+5:30
महापालिकेच स्थायी समितीच्या सभेत मंजुरी घेऊन सर्वसाधारण सभेत आणण्यात येणाऱ्या वाहनतळ धोरणाला शहरातील संस्था, संघटनांनीही विरोध दर्शवला आहे. काही पक्षांनी त्याविरोधात गुरुवारी महापालिका मुख्यालयात आंदोलनही केले.
पुणे : महापालिकेच स्थायी समितीच्या सभेत मंजुरी घेऊन सर्वसाधारण सभेत आणण्यात येणाऱ्या वाहनतळ धोरणाला शहरातील संस्था, संघटनांनीही विरोध दर्शवला आहे. काही पक्षांनी त्याविरोधात गुरुवारी महापालिका मुख्यालयात आंदोलनही केले.
आप पक्षाच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. जनतेला विश्वासात न घेता या धोरणाला मंजुरी देण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. सुलभ नियम, भ्रष्टाचारमुक्त अंमलबजावणी व प्रबोधन यासह हे धोरण अवलंबण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. सुभाष कारंडे, सय्यद अली, सतीश यादव, राजेश चौधरी, किशोर मुजुमदार, गजानन भोसले, सुरेंद्र पुरोहित, नितीन बर्वे, विजय गायकवाड, गणराज ताटे, संदेश दिवेकर, मनोज थोरात, अर्शद अन्सारी, केदार ढमाले, गणेश वैराट, फरहान शेख, आनंद अंकुश, मुकुंद किर्दत आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
हमारी अपनी पार्टी पक्षानेही महापौर मुक्ता टिळक यांना पत्र पाठवून या धोरणाला मंजूरी देऊ नये, अशी मागणी केली आहे. पुणे शहर अध्यक्ष राजेश अगरवाल यांनी सांगितले, की महापौरांची भेट घेण्यासाठी गेलो असताना त्यांनी भेट दिली नाही, याचा निषेध म्हणून महापालिका मुख्यालयात धोरणाच्या विरोधात घोषणा दिल्या.
माजी आमदार मोहन जोशी यांनी या धोरणाच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा दिला. महापालिका व आरटीओसुद्धा नागरिकांकडून रस्त्यासाठीचा कर घेत असते, असे असताना आता पुन्हा पार्किंगसाठी शुल्क अदा करावे लागणे अयोग्य आहे, असे जोशी म्हणाले. काँग्रेसचेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय बालगुडे यांनी या विषयावर पालकमंत्री गिरीश बापट व खासदार अनिल शिरोळे यांनी त्यांची भूमिका पुणेकरांसाठी जाहीर करावी, अशी मागणी केली.