निम्म्या भागाला नाही प्रतिनिधित्व
By admin | Published: February 25, 2017 02:40 AM2017-02-25T02:40:43+5:302017-02-25T02:40:43+5:30
प्रभाग पद्धतीत पूर्वीच्या दोन ते तीन प्रभागांची मोडतोड करून बनविलेल्या या नव्या ४च्या प्रभाग पद्धतीत उमेदवारी देताना पक्षांनी सर्व भागाला प्रतिनिधीत्व मिळेल
पुणे : प्रभाग पद्धतीत पूर्वीच्या दोन ते तीन प्रभागांची मोडतोड करून बनविलेल्या या नव्या ४च्या प्रभाग पद्धतीत उमेदवारी देताना पक्षांनी सर्व भागाला प्रतिनिधीत्व मिळेल, अशा उमेदवारांची निवड करण्याऐवजी निवडून येण्याची शक्यता या निकषावर उमेदवारी दिल्याने गुरुवारी झालेल्या मतमोजणीत काही भागांना आता महापालिकेत प्रतिनिधीत्वच मिळाले नसल्याचे दिसून येत आहे़ प्रभाग क्रमांक ७ आणि १४ या दोन प्रभागांचा विचार केल्यास फर्ग्युसन रोडच्या पश्चिमेकडील भागाला ८ नगरसेवकांमध्ये प्रतिनिधीत्व मिळाले नसल्याचे दिसत आहे़
अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत़ ड्रेनेज तुंबले आहे, पाणी येत नाही, रेशनकार्डवर धान्य मिळत नाही़ शाळेत अॅडमिशन मिळवून द्या, भटक्या कुत्र्यांचा त्रास अशा अनेक तक्रारी नगरसेवकांकडे केल्या जातात़ याशिवाय अंतर्गत रस्त्यावरील पार्किंग, गटागटांमधील, शेजाऱ्यांमधील भांडण्यापर्यंतच्या तक्रारी जवळ असलेला हक्काचा माणूस म्हणून लोक नगरसेवकांकडे जात होते़ पण, चारच्या प्रभागामुळे प्रभाग खूप मोठा झाल्याने त्यांना या नगरसेवकांना भेटण्यासाठी दूरवर जावे लागणार आहे़
प्रभाग क्रमांक ७मध्ये गोखलेनगर, जनवाडी, चतु:शृंगी परिसर, कस्तुरबा वसाहत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कामगार पुतळा, पाटील इस्टेट, भोसलेनगर, अशोकनगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वाकडेवाडी, संगमवाडीचा भाग, मुळा रोड हा परिसर येतो़ या प्रभागातून निवडून आलेले भाजपाचे चारही उमेदवार हे एकाच भागात राहतात़ भाजपापुरस्कृत रेश्मा भोसले या भोसलेनगरमध्ये राहतात़ त्यांचे कार्यालय हे वाकडेवाडीला आहे़ राजश्री काळे या दत्तवाडी येथे प्रभागापासून खूप लांब राहणाऱ्या आहेत़ निवडणुकीत त्यांना तिकीट मिळाल्यावर त्यांनी गोखलेनगरमधील निसर्ग सोसायटीत कार्यालय केले आहे़ आदित्य माळवे हे मॉडेल कॉलनीत राहतात़ पण, त्यांचा भाग या प्रभागात येत नसून तो प्रभाग क्रमांक १४ मध्ये येतो़ सोनाली लांडगे या वाकडेवाडी येथील पीएमसी कॉलनीत राहतात़
प्रभाग क्रमांक १४ मधून विजयी झालेले भाजपाचे ४ ही उमेदवार फर्ग्युसन रोडच्या पूर्व भागात राहतात़ सिद्धार्थ शिरोळे घोले रोडला, स्वाती लोखंडे या कामगार पुतळा येथे, ज्योत्स्ना एकबोटे रेव्हेन्यू कॉलनीत राहतात़ नीलिमा खाडे या पुलाचीवाडी येथे राहतात़
प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना, मॉडेल कॉलनीमध्ये गोखलेनगरचा काही भाग, वडारवाडी, बीएमसीसी कॉलेज, लॉ कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान, मनपा भवन, घोले रोड, इंजिनिअरिंग कॉलेज, पीवायसी, शिवाजीनगर पोलीस लाईन, मॉडेल कॉलनी, पुलाचीवाडी हा भाग येतो़ हे पाहता गोखलेनगर, वडारवाडी, लॉ कॉलेज, बीएमसीसी कॉलेज, चतु:शृंगी परिसर, कस्तुरबा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या संपूर्ण परिसरातील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही़ भाजपाने तिकीटवाटप केले, त्या वेळीच पक्षातील नाराजांनी हा मुद्दा उपस्थित केला होता़ हा सर्व परिसर आता नगरसेवकांविना पोरका झाला आहे़ (प्रतिनिधी)