जागा नाही ताब्यात, सगळे इमले हवेतच
By admin | Published: July 4, 2017 04:28 AM2017-07-04T04:28:12+5:302017-07-04T04:28:12+5:30
शहराची नवी ओळख निर्माण करून देणाऱ्या मेट्रो प्रकल्पापुढील अडचणींमध्ये वाढच होत चालली आहे. या प्रकल्पासाठी परदेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराची नवी ओळख निर्माण करून देणाऱ्या मेट्रो प्रकल्पापुढील अडचणींमध्ये वाढच होत चालली आहे. या प्रकल्पासाठी परदेशी बँकांकडून कर्ज काढण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागा मात्र अद्याप महामेट्रोच्या ताब्यात आलेल्या नाहीत. या प्रकल्पात एकूण ७०० जुन्या झाडांवर कुऱ्हाड पडणार असून, त्या बदल्यात महामेट्रोच्या वतीने ७ हजार झाडे लावण्याचे नियोजन केले गेले आहे असे सांगण्यात आले.
पुणे मेट्रोच्या मुख्य स्थानकांसाठी महामेट्रो कंपनीला शिवाजीनगर गोदाम, कोथरूड (वनाज) व कृषी महाविद्यालय येथील जागा हवी आहे, मात्र या तीनही संस्थांचा जागा देण्याला विरोध आहे. तीनपैकी एकही जागा अद्याप मेट्रोला मिळालेली नाही. तसेच अन्य ठिकाणीही काही जागांची कंपनीला आवश्यकता असून, त्यालाही गती मिळणे अवघड झाले आहे. वृक्षारोपणासाठी मात्र पाचगाव पर्वती व आकुर्डी येथे अशा दोन जागा मिळाल्या आहेत. त्याठिकाणी एकूण ७ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
काही अपवाद वगळल्यास बहुसंख्य जागा सरकारी मालकीच्या आहेत, त्यामुळे त्या मिळण्यात अडचण येणार नाही, येत्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे दीक्षित म्हणाले. मात्र कृषी महाविद्यालयाचा त्यांची जागा देण्यास तीव्र विरोध आहे. शिवाजीनगर न्यायालयानेही असाच विरोध केला आहे. कोथरूड (वनाज) येथील जागेत शिवसृष्टी करावी म्हणून स्थानिक नगरसेवक दीपक मानकर व अन्य काही शिवप्रेमी संघटना प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या जागेचाही वाद आहेच. या
वादांविषयी काहीही स्पष्टीकरण न देता दीक्षित यांनी येत्या दोन
महिन्यांत जागेची समस्या मिटलेली असेल असे सांगितले.
रेंजहिल्स ते शिवाजीनगर या मार्गाचे काम सुरू झाले आहे. वनाज ते रामवाडी या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे त्याची फेरनिविदा काढावी लागली. शिवाजीनगर ते स्वारगेट हा शहराच्या मध्यवस्तीतील भाग असून तिथून ५.१९ किलोमीटर भुयारी मार्ग काढण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाचा एकूण खर्च ८४५ मिलियन युरो असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. त्यातील ६४५ मिलियन युरो युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक देणार आहे. उर्वरित २०० मिलियन युरोसाठी फ्रान्स व जर्मनी येथील बँका कर्ज देण्यास उत्सुक आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी जर्मन बँकेने तर नागपूरसाठी अर्थसाह्य केलेही आहे असे दीक्षित म्हणाले. एकीकडे खर्चासाठी निधी उभा करणे सुरू असताना दुसरीकडे प्रकल्पाचे प्राथमिक कामही अजून सुरू झालेले नाही याकडे दीक्षित यांचे लक्ष वेधले असता त्यांनी, काम सुरू झाले असल्याचा दावा केला.
जमिनीखाली तब्बल २० मीटर अंतरावरून हा मार्ग जाईल. अत्याधुनिक यंत्रांद्वारे तो करण्यात येणार आहे. त्याचा जमिनीवरील एकाही वास्तूला धक्का लागणार नाही. १०५ तज्ज्ञ केवळ या एका मार्गासाठी काम करीत आहेत. जगभरातील अनेक तज्ज्ञांचा त्यासाठी सल्ला घेण्यात येत आहे अशी माहिती दीक्षित यांनी दिली.
कामामुळे वाहतुकीत अडचणी
पुणेकरांना सन २०२१मध्ये मेट्रोत बसता येईल
असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला. काम सुरू होताना पुण्यामध्ये वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.
मात्र त्यासाठी वाहतूक शाखा, ठेकेदार, स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने पर्यायी मार्गांचा स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार केला जाईल असे ते म्हणाले. अजून हा वाहतूक आराखडा तयार झालेला नाही, प्रत्येक ठिकाणी तो वेगळा असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
मेट्रोच्या प्रतिकृतीस नकार
1महामेट्रोने छत्रपती संभाजी उद्यानात मेट्रोची
प्रतिकृती करण्याची परवानगी मागितली होती. यात हुबेहूब मेट्रोचा एक डबा उभा करण्यात येतो. त्यात मेट्रोसंबंधी सर्व माहिती मिळते. नागपूर येथे अशी
प्रतिकृती करण्यात आली व त्याला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
2महापालिकेच्या उद्यान विभागाने मात्र संभाजी उद्यानात कसलेही बांधकाम करण्यास एनजीटीची मनाई आहे असे स्पष्ट करून अशी प्रतिकृती करण्यात नकार दिला. त्याबाबत बोलताना दीक्षित यांनी, आम्ही यासाठी दुसरीकडे जागा पाहत आहोत, असे सांगितले.