ना गायकवाड ना पुणेकर... काँग्रेसकडून 'या' निष्ठावान नेत्याला पुण्यातील उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 12:18 AM2019-04-02T00:18:54+5:302019-04-02T07:09:50+5:30
पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मी उत्सुक आहे. गेली 38 वर्षे पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची कामे करीत असून कधीही पक्ष सोडलेला नाही.
पुणे - काँग्रेसकडून यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील उमेदवाराचा सुरु असलेला तिढा कायमचा सुटला आहे. काँग्रेसने पुण्यातून माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी 9 वी यादी जाहीर केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये पुण्यातून मोहन जोशी आणि रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारी निवडीनंतर मोहन जोशींनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मी उत्सुक आहे. गेली 38 वर्षे पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची कामे करीत असून कधीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे तिकिटासाठी पक्षश्रेष्ठी निष्ठेचा विचार करतील, असा विश्वास आमदार मोहन जोशी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी बोलून दाखवला होता. मात्र, एकनिष्ठेच्या निकषाला धरुन 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मोहन जोशी हे काँग्रेसचे माजी आमदार असून एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. विधान परिषदेच्या आश्वासन समितीवर आमदार मोहन जोशी यांची 2012-14 मध्ये फेरनिवड करण्यात आली होती.
आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन अनेक राजकीय पक्षांचे उमेदवारही ठरले, प्रचाराची रणधुमाळीही सुरु झाली मात्र काँग्रेससारख्या इतकी वर्ष जुना असलेल्या पक्षाला पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार सापडला नसल्याचं चित्र होतं. त्यामुळे मतदानाची तारीख जवळ आली, इतर पक्षाच्या विरोधी उमेदवारांचे अर्जदेखील दाखल झाले तरीही पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा नव्हती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. माजी आमदार मोहन जोशी यांच्यारुपाने पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला आहे.
पुणे शहर काँग्रेस कार्यालयात जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारही सुरु केला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अनेक नावांची चर्चा सुरु होती. अरविंद शिंदे, सुरेखा पुणेकर तर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाडही पुणे लोकसभा जागेसाठी इच्छुक होते. मात्र इच्छुक उमेदवारांपैकी कोणत्याचा नावाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाला नाही. अखेर काँग्रेसच्या हायकमांडने पक्षनिष्ठतेचा निकष पाळल्याचे या उमेदवारीवरुन दिसून येते.
Congress has released a list of 9 candidates for #LokSabhaElections2019 ; 1 from Gujarat, 2 from Maharashtra and 6 from Rajasthan pic.twitter.com/hbMKLZw4iG
— ANI (@ANI) April 1, 2019
मोहन जोशी थोडक्यात ओळख
-मोहन जोशी
-माजी विधान परिषद सदस्य
-काँग्रेसचे 40 वर्षांहून अधिक काळ सदस्य
-पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावान सदस्य
-सुरुवातीपासून इच्छुकांच्या यादीत नाव