दाम नाही तर काम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:11 AM2020-12-02T04:11:12+5:302020-12-02T04:11:12+5:30
पंधरवडाचा सर्वे करण्यास नकार सांगवी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणाºया आशा स्वयंसेविका यांचे पाच महिन्यांचे वेतन ...
पंधरवडाचा सर्वे करण्यास नकार
सांगवी :
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणाºया आशा स्वयंसेविका यांचे पाच महिन्यांचे वेतन रखडले आहे. शासनाने वाढीव मानधनाबाबत दिलेल्या आश्वासनाची अध्याप देखील पूर्तता केली नसल्याने दाम नाही तर काम नाही, असा निर्धार आशा स्वयंसेविका यांनी केला आहे. याबाबत शासनाला पत्रकाद्वारे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्या थकित मानधना बाबत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्वयंसेविकांनी केला आहे. यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे.
आशा स्वयंसेवीका व गट प्रवर्तक या ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे काम करत आहोत. त्यांना कामावर आधारित मोबदला दिला जातो. जेवढे काम करेल तेवढाच त्यांना मोबदला दिला जातो. सध्या कोरोनासारख्या महामारीत स्वत:ची व कुटूंबाची पर्वा न करता गावपातळीवर काम त्यांनी केले आहे. जिल्ह्यात जवळपास दोन ते तिन वेळा त्यांनी सर्वेक्षण पूर्ण केले आहे. असे असतांनाही त्यांना पाच महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.
शासनाकडे मानधन वाढीसाठी राज्यभर अनेक मोर्चे काढून निदर्शने केले आहेत. वेळोवेळी बोलणी केलेली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी जुलै २०२० मध्ये शासन निर्णय निर्गमित करून, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना अनुक्रमे २ हजार रुपये व ३ हजार रुपये महिना असा मोबदला वाढवला आहे. संपाचा इशारा देताच त्याची अंमलबजावणी करून आॅक्टोबर च्या अगोदर आम्ही संपावर जाऊ, असा इशारा देताच दिवाळीच्या आधी बँक खात्यावर चार महिन्यांचे मानधन जमा करण्याचे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र, दिवाळी उलटून गेली तरी देखील बँक खात्यावर शासनाकडून मानधन जमा झाले नाही. तरी देखील शासन काम करायला भाग पाडत आहे.
परंतु, यापुढे आशा स्वयंसेवी यांचे मानधनवाढीचे थकीत रुपये १० हजार व १५ हजार रुपये बँक खात्यावर जमा झाल्याशिवाय आज पासून काम न करण्याचा निर्णय घेत घेतला आहे. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर रोजी कुष्ठरोग निर्मूलन पंधरवडा आहे. या पंधरवड्यात कुष्ठरोगाचे रुग्ण शोधून काढणे व त्याचा औषधोपचार करणे. यासाठी महाराष्ट्रभर सर्वेचे काम चालू केले आहे. परंतु या कामावर स्वयंसेवीकांनी बहिष्कार घातला आहे. तर या कामासाठी पंधरा दिवसांसाठी शासनाने केवळ दिवसाला ५० रुपए देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे थकित वेतन देऊन, कुष्ठरोगाचे रुग्ण शोधून काढणे व त्याचा औषधोपचार करणे यासाठी वाढीव ५० रुपयांच्या जागी वाढीव रक्कम देण्याची मागणी केली आहे.
चौकट
आॅक्टोंबर महिन्यात अर्थखात्याने आरोग्य विभागाला ७८ कोटी वर्ग केले होते. यामुळे दिवाळी आधीच थकित मानधन जमा करण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते. मात्र, थकीत मानधन न दिल्यामुळे स्वयंसेविकांच्या मुलाबाळांसाठी दिवाळीसारखा सण अंधारात गेला आहे. यामुळे १ डिसेंबर पासून कुष्ठरोग सस्वयंसेविका सर्वे करणार नसल्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत.
चौकट
आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी वर्तमानपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मुलाखती देऊन, आशा व गटप्रवर्तक यांची आम्ही दिवाळी गोड करू, असे आश्वासन दिले होते. परंतु, आजतागायत थकित मानधनापोटी एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळेच दाम नाही तर काम नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.
कोट
शासन आशा स्वयंसेविकांची पिळवणूक करत असून, गेली पाच महिन्यांचे वेतन थकित आहे. यामुळे काम करण्याची मानसिकता नसून काम करणे अवघड झाले आहे, शासनाने लवकरात लवकर वेतन जमा करावे.
- श्रीमंत घोडके, सरचिटणीस महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक युनियन
———————————