रेल्वे सुरक्षा दलाच्या दक्षतेने महाविद्यालयीन तरुणीची वाचली अब्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 08:44 PM2019-11-23T20:44:12+5:302019-11-23T20:48:43+5:30
आळंदी (म्हातोबाची) रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेलाईनच्या कडेला एक दुचाकी त्यांना आढळून आली़. इतक्या रात्री येथे गाडी पाहून त्यांचा संशय आला़...
पुणे : कारमधुन महाविद्यालयातील तिघा मुलांबरोबर गेलेल्या तरुणीचे ७ ते ८ जणांनी अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असतानाच रेल्वे लाईनच्या शेजारुन गस्त घालणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाला या तरुणीचा आवाज कानावर पडला़. त्या आवाजाचा दिशेने ते गेले असताना त्यांच्या टॉर्चचा प्रकाशामुळे शेतातील काही जण पळून गेले़. पोलीस पुढे गेल्यावर त्यांना एक तरुणी घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली़. पोलीस पथकाच्या दक्षतेमुळे सामुहिक अत्याचारापासून महाविद्यालयीन तरुणीची अब्रु वाचली़. ही घटना फुरसुंगीजवळील आळंदी (म्हातोबाची) रेल्वे स्टेशनजवळील रेल्वेलाईनजवळील शेतात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडला़.
याबाबत रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले की, रेल्वे सुरक्षा दलातील घोरपडीचे पोलीस निरीक्षक पी़.सी़.सी़. कासार, पोलीस शिपाई बी़. जी़. कोंडे आणि एऩ. आऱ. कुंभार हे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फुरसंगीजवळील रेल्वे मार्गाच्या कडेने गस्त घालत होते़. त्यावेळी आळंदी (म्हातोबाची) रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेलाईनच्या कडेला एक दुचाकी त्यांना आढळून आली़. इतक्या रात्री येथे गाडी पाहून त्यांचा संशय आला़. त्यावेळी त्यांना बाजूच्या शेतातून आवाज आल्याने त्यांनी नाईट टॉर्च लावून शेतात प्रवेश केला़ त्यांना पाहून काही जण पळून गेले़. थोडे पुढे गेले तर एक मुलगी घाबरलेल्या अवस्थेत गेटजवळ मिळाली़. तिच्याकडे विचारणा केल्यावर तिने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती पोलिसांना दिली़.
बिहारच्या २० वर्षाच्या तरुणीने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही तरुणी लोणी येथील एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे़. या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही तरुणी, तिचा ३ मित्रासह चारचाकी गाडीमधून म्हातोबाची आळंदी येथील रेल्वेस्थानक येथे गेले होते. तेथे रस्त्याच्या कडेला बसून ते बिअर पीत होते. रात्री साडेदहा वाजता तीन दुचाकीवरुन सात ते आठ तरुण आले. त्या मुलांच्या हातात लोखंडी रॉड, तलवार व कोयता अशी हत्यारे होती. त्यांनी शिवीगाळ, दमदाटी करून सोन्या घायाळची चौकशी केली. या गाड्या पहाताच तिचे मित्र तेथून पळून गेले. त्यातील दोघांनी पीडित तरुणीला त्यांच्या दुचाकीवर बसवून रेल्वे स्थानकाशेजारील खोलीमध्ये नेले. तेथे तिचा विनयंभग केला. त्या बदमाशांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने तिला जबरदस्तीने तेथे घेऊन आले होते़. दुचाकी रेल्वे लाईनच्या शेजारी लावून ते तिला त्यांनी शेतात नेले होते़. त्यावेळी पोलीस तेथे आल्याने तिची या बदमाशांच्या तावडीतून तिची सुटका झाली़. पोलिसांनी त्यांची माहिती घेऊन पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले़.
संबंधित हल्लेखोर तरुणांची ओळख पटविण्यात यश मिळाले असून, लवकरच त्यांना जेरबंद करू, अशी माहिती पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली.