पुण्याला पाणी कमी पडणार नाही : मुख्यमंत्र्यांचे महापौरांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 05:10 PM2019-01-29T17:10:19+5:302019-01-29T17:13:40+5:30
जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याबाबत दिलेल्या निकालामुळे पाणी कपातीचे संकट घोंगावू लागले होते...
पुणे : पुणेकरांचे पाणी तोडणार नाही, सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार असून काळजी करू नये असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर मुक्ता टिळक यांना दिले आहे. जालना येथे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी गेलेल्या महापौरांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यांनीही पुणेकरांना दिलासा दिल्याचे टिळक यांनी सांगितले.
जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याबाबत दिलेल्या निकालामुळे पाणी कपातीचे संकट घोंगावू लागले होते. महापालिकेस वषार्ला 8.19 टीएमसी पाणी द्यावा असा निर्णय दिला तर शासनाने महापालिकेस वषार्ला 11.50 टीएमसी पाणी द्यावे असा करार असल्याने त्या कारारानुसारच पाणी वापरावे असे पत्र पाठविले होते. मागील आठवड्यात महापालिकेचे पाणी तोडण्यात होते. त्यानंतर जलसंपदा अधिकारी आणि महापालिका पदाधिकारी यांची महापालिकेमध्ये बैठक झाली. त्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाला असला तरी, पाणी कपात होण्याची शक्यता होती. याबाबत मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री, जलसंपदा आणि महापालिका पदाधिका?्यांमध्ये बैठक होणार होती. मात्र, ही बैठक होऊ शकली नाही.
त्यावेळी महापालिका आयुक्त पाणी वापराबाबत जलसंपदा विभागाला लेखी पत्र देतील आडे ठरले होते. पाण्याबाबत उच्च स्तरीय बैठक होईपर्यंत शहराला 1350 एमएलडी पाणी कमी करू नये असे बैठकीत ठरले होते.
दरम्यान, जालना येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महापौर टिळक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना पुण्याचे पाणी कमी करू नये अशी विनंती केली. यावेळी उपस्थित असलेल्या जलसंपदामंत्री महाजन यांनीही संमती दर्शविल्याचे टिळक म्हणाल्या.
उपलब्ध पाणी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांना देऊन दोघांचीही निकड कशी भागवता येईल याबाबत विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. तूर्तास तरी पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही. मात्र, आगामी काळात उपलब्ध पाणी साठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेतले जातील अशी शक्यता असल्याने मार्च महिन्यात पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत.