गणेशोत्सवाचा ‘सांस्कृतिक’ विभागाशी नाही संबंध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 10:54 PM2017-08-18T22:54:17+5:302017-08-18T22:55:30+5:30

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? यावरून पुण्यात वाद रंगलेला असताना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानेही हात वर केले आहेत. एकीकडे या विभागाने मागील वर्षी लोकमान टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते असल्याचे स्पष्ट करून त्याविषयी अभियानही राबविले.

No relation with 'cultural' department of Ganesh festival! | गणेशोत्सवाचा ‘सांस्कृतिक’ विभागाशी नाही संबंध!

गणेशोत्सवाचा ‘सांस्कृतिक’ विभागाशी नाही संबंध!

Next

पुणे, दि. 18 - सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? यावरून पुण्यात वाद रंगलेला असताना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानेही हात वर केले आहेत. एकीकडे या विभागाने मागील वर्षी लोकमान टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते असल्याचे स्पष्ट करून त्याविषयी अभियानही राबविले. तर दुसरीकडे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात कोणी व कधी केली याबाबतची माहितीच आपल्या विभागाशी संबंधित नसल्याचे विभागाने म्हटले आहे.

पुणे महापालिकेकडून यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच त्याची सुरूवातही झाली. मात्र श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर आक्षेप घेतला आहे. भाऊ रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असल्याचा दावा मंडळाने केला आहे. यावरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. यापार्श्वभुमीवर पुण्यातील गणेश चव्हाण यांनी माहिती अधिकारांतर्गत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात कोणी व कधी सुरूवात केली, याविषयी माहिती मागविली होती. त्यावर या विभागाने हा विषय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाशी संबंधित असल्याचे सांगून चव्हाण यांचा अर्ज या विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला.

त्यानंतर सांस्कृतिक विभागानेही माहिती देण्याबाबत असमर्थता दर्शविली. हा विषय या कार्यासनाशी संबंधित नसल्याने याबाबत कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत, असे उत्तर दिले आहे. राज्य शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो का? याची माहिती देताना विभागाने केवळ मागील वर्षात अपवादात्मकपणे ‘सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती, असे म्हटले आहे. 

सांस्कृतिक विभागाने २७ जुलै २०१६ रोजी प्रसिध्द केलेल्या शासन निर्णयामध्ये लोकमान्य टिळक हे गणेशोत्सवाचे प्रणेते असल्याचे स्पष्टपणे नमुद केले आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीला १२५ वर्ष पुर्ण होत असल्यानिमित्त मागील वर्षी ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ही राबविण्यात आले. त्याअंतर्गत गणेशोत्सव सजावट स्पर्धाही घेण्यात आली होती. त्यासाठी राज्यभरातील मंडळांना बक्षिसेही देण्यात आली. सांस्कृतिक विभागाकडून एकीकडे जाहीरपणे असे उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात कोणी केली, याची माहिती नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: No relation with 'cultural' department of Ganesh festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.