गणेशोत्सवाचा ‘सांस्कृतिक’शी नाही संबंध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:16 AM2017-08-19T05:16:06+5:302017-08-19T05:17:44+5:30
सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? यावरून पुण्यात वाद रंगलेला असताना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानेही हात वर केले आहेत.
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? यावरून पुण्यात वाद रंगलेला असताना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानेही हात वर केले आहेत. एकीकडे या विभागाने मागील वर्षी लोकमान टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते असल्याचे स्पष्ट करून त्याविषयी अभियानही राबविले. तर दुसरीकडे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात कोणी व कधी केली याबाबतची माहितीच आपल्या विभागाशी संबंधित नसल्याचे विभागाने म्हटले आहे.
पुणे महापालिकेकडून यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच त्याची सुरूवातही झाली.
मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर आक्षेप घेतला आहे. भाऊ रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असल्याचा दावा मंडळाने केला आहे. यावरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. यापार्श्वभुमीवर पुण्यातील गणेश चव्हाण यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली होती.
त्यावर या विभागाने हा विषय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाशी संबंधित असल्याचे सांगून चव्हाण यांचा अर्ज या विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक विभागानेही माहिती देण्याबाबत असमर्थता दर्शविली. त्यामुळे या मुद्दाने आता नवीन वाद रंगण्याची चिन्हे आहेत़