संमेलनाध्यक्षांच्या निधीबाबत स्थानिक शाखांचा नाही संबंध?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 01:23 AM2018-12-20T01:23:03+5:302018-12-20T01:23:26+5:30
नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखाध्यक्षांची माहिती : मध्यवर्तीमध्ये संवादाचा अभाव
पुणे : नाट्य संमेलनाचा अध्यक्ष मध्यवर्ती नाट्य परिषदेकडून निवडला जातो. त्याची नियमावली, अटी मध्यवर्तीने घटनेद्वारे ठरविलेल्या आहेत. संमेलनाच्या संदर्भातल्या पूर्तता मातृसंस्थेनेच करणे अपेक्षित असते. संमेलनाध्यक्षांना पैसे अथवा मानधन देणार असू तर त्याची संपूर्ण जबाबदारी मध्यवर्तीची आहे. यात स्थानिक शाखांचा संबंध येतोच कुठे? जर संबंध असेल तर आजपर्यंत मध्यवर्तीने याची कोणतीच कल्पना शाखांना का दिली नाही? संमेलनाध्यक्षांना दीड लाख रुपयांच्या तरतुदीची माहिती देण्यासंबंधीचा चेंडू कोषाध्यक्षांनी स्थानिक शाखांकडे टोलवणे म्हणजे मध्यवर्ती आणि शाखांमध्ये संवाद नसण्याचे हे लक्षण आहे, अशी टीका करत नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवीन घटनेनुसार नाट्यसंमेलनाध्यक्षांना वर्षभर एखादा प्रकल्प किंवा उपक्रम राबविण्यासाठी दीड लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांना या निर्णयाबाबत विंगेतच ठेवण्यात आले आहे. ‘नाट्यसंमेलनाध्यक्षांना अशी माहिती देणे, आम्हाला सयुक्तिक वाटत नाही. ही जबाबदारी स्थानिक शाखेची आहे’ असे सांगत मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षांनी हा चेंडू पुण्यातील दोन शाखांकडे टोलविला आहे. यासंदर्भात नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता आमचा काहीही संबंध नसताना, शाखांना कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नसताना शाखांनीच संमेलनाध्यक्षांना निधीच्या तरतुदीची माहिती दिली पाहिजे, हे मध्यवर्तीचे पदाधिकाऱ्याचे सांगणे ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन पदाधिकारी कारभार हातात घेतात त्यांनी आर्थिक देवाणघेवाण याची माहिती जुन्या पदाधिकाºयांकडून घेणे अपेक्षित असते. मुळात जुन्या-नव्या पदाधिकाºयांची एकत्रित बैठक घेतली तेव्हा जुन्या पदाधिकाºयांकडून ही माहिती घेतली आहे का? असा प्रश्न पडतो.
आर्थिक विषयासंदर्भात काही ठराव कायमस्वरूपी झालेले असतात. त्याची माहिती पदाधिकाºयांना असणे आवश्यक असते. नाट्य संमेलनाध्यक्ष हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने बिनविरोध निवडलेला अध्यक्ष असतो. जुन्या-नवीन कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीवेळी नाट्य संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार उपस्थित होत्या. याच वेळी मध्यवर्तीने वर्षभर काय करणे अपेक्षित आहे याविषयीचे पत्र संंमेलनाध्यक्षांना द्यायला हवे होते. मात्र ते न करता स्थानिक शाखांवर जबाबदारी ढकलणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
या अशा गोष्टी होतात तेव्हा अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष यांच्यात संवादाचा अभाव असल्याचे दिसते. कार्यकारिणीच्या पूर्वी पदाधिकाºयांची बैठक होते. काही पत्र, विषय असतात त्याच्यावर चर्चा करून ते नियामक मंडळासमोर येतात.