पुणे महापालिकेच्या 'टेली मेडिसिन' सुविधेला मिळेना प्रतिसाद; कॉल सेंटर्सचे फोन क्रमांक पोहचविण्यात अपयश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 11:46 AM2020-08-30T11:46:48+5:302020-08-30T11:47:11+5:30
खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर सुरु केली होती सुविधा
पुणे : गृह विलगीकरणात राहून घेणा-या रुग्णांना फोनवरून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी महापालिकेने सुरु केलेल्या ‘टेली मेडिसिन’ सुविधेला नागरिकांकडून अजिबातच प्रतिसाद मिळालेला नाही. यामध्ये नागरिकांचा दोष नाही तर पालिकाच नागरिकांपर्यंत या टेली मेडिसिन कॉल सेंटरचे क्रमांक पोहचविण्यात कमी पडल्याचे चित्र आहे.
खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना दूरध्वनीवरुन वैद्यकीय सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच व्हिडीओ कॉलद्वारे उपचारांबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी दीड हजारांपासून ते पाच हजारांपर्यंतचे दर आकारले जातात. गृह विलगिकरणात असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सल्ला, त्यांची तपासणी आणि विचारपूस, औषधांची माहिती व समुपदेशन देण्याची आॅनलाईन सुविधा विविध खासगी रुग्णालयांनी सुरू केली आहे.
महापालिकेने त्याच धर्तीवर नागरिकांसाठी मोफत ‘टेली मेडिसिन’ची सुविधा सुरू केली असून कमला नेहरू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष त्याकरिता निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणाहून २४ बाय ७ कोरोनासंदर्भात वैद्यकीय सल्ला आणि मदत देण्याचे काम सुरू करण्यात आले होते. शहारातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्याही मोठी आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निदेर्शानुसार ज्या रुग्णांना घरामध्ये राहून उपचार घेणे शक्य आहे अशा रुग्णांना गृह विलगिकरणात राहून उपचार घेण्याची अनुमती पालिकेकडून देण्यात आली आहे. लक्षणे असलेले आणि नसलेले जवळपास साडेसात हजार रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्याकरिता काही निकषही ठरवून देण्यात आले आहेत. तसेच, त्या निकषांचे पालन होते की नाही हे पाहण्याची यंत्रणाही लावण्यात आली आहे.
पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात २० डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना लॅपटॉपसह इंटरनेट कनेक्शन व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. डॉक्टर्स व्हिडिओ कॉलिंगद्वारे रुग्णांशी संपर्कात राहणार असून त्यांच्या दैनंदिन प्रगतीवर लक्ष ठेवणार होते. त्याकरिता डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले होते. खासगी रुग्णालयांच्याच बरोबरीने पालिकेची आॅनलाईन यंत्रणा उभी राहणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले होते. परंतू, आरोग्य विभागाकडून येथील दूरध्वनी क्रमांकच रुग्णांना न दिल्याने या सेंटरवर फोनच आले नसल्याचे समोर आले आहे.