ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड..! आयटीतील प्रवाशांची होतेय गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 04:07 PM2024-11-26T16:07:28+5:302024-11-26T16:11:19+5:30
हिंजवडी : आयटी पार्क परिसरात प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या पीएमपीएमएल बसेसची नेहमीच वर्दळ पहायला मिळते. मात्र, जिथे पीएमपीएमएल बसचे थांबे ...
हिंजवडी : आयटी पार्क परिसरात प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या पीएमपीएमएल बसेसची नेहमीच वर्दळ पहायला मिळते. मात्र, जिथे पीएमपीएमएल बसचे थांबे आहेत त्या ठिकाणी प्रवाशांना ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड अशी गैरसोय पहायला मिळत आहे.
त्यामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळत असून, संबंधित पीएमपीएल प्रशासनाने सर्व प्रमुख मार्गांवर हक्काचे शेडसह बस थांबे उभे करावे, अशी आग्रही मागणी होत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बस थांब्याजवळ खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा गराडा पहायला मिळतो. त्यामुळे, नाइलाजस्तव आलेल्या बसेस भर रस्त्यावर उभ्या राहत असल्याने, त्यातून मार्ग काढत प्रवाशांना बसमध्ये चढताना तारेवरची कसरत करावी लागते.
दरम्यान, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद पीएमपीएमएलला मिळत असूनही, मूलभूत सोयी-सुविधांअभावी प्रवासी वंचित रहात असल्याचे वास्तव आयटीनगरी परिसरात पहायला मिळत आहे.
हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक सक्षम केली पाहिजे, असे मत अनेक संस्था, संघटनांनी व्यक्त केले होते. त्यामुळे, उपनगरातून आयटी पार्ककडे येणाऱ्या पीएमपीएमएल बसच्या फेऱ्यासुद्धा वाढविण्यात आल्या. त्यास, नागरिकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला.
दिवसभर, आयटी पार्क परिसरातील सर्वच बसेस प्रवाशांनी तुडुंब भरून असतात. मात्र, ज्या ठिकाणी बसेस थांबतात त्या ठिकाणी, अधिकृत बस थांबा क्वचित निदर्शनास पडतो. अन्यथा जागोजागी नागरिक घोळका करून भर रस्त्यावर बसची वाट पाहत उभे असतात. माण, मारुंजीसह हिंजवडी परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला उत्तम प्रतिसाद देत असूनही, प्रवाशांना मात्र ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड अशा गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे, पीएमआरडीए, एमआयडीसी, पीएमपीएल प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. हिंजवडी-येथील मुख्य चौकात बस थांबा शेड नाही. त्यात, खासगी वाहनेसुद्धा पार्क होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.