अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुठलीच ‘रिस्क’ नको रे बाबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:11 AM2021-03-06T04:11:23+5:302021-03-06T04:11:23+5:30
निलेश राऊत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आमच्या गावाची यात्रा आहे, तेवढे नैवेद्य वगैरे करून येते, मी दवाखान्यात जात ...
निलेश राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आमच्या गावाची यात्रा आहे, तेवढे नैवेद्य वगैरे करून येते, मी दवाखान्यात जात आहे, तब्बेत ठीक नाही, पण मतदानाला येतो़, आदी कुठलीही कारणे न देता शुक्रवारी भाजपने स्थायी समितीच्या निवडणुकीत कुठलीच ‘रिस्क’ नको रे बाबा ! म्हणत, स्थायी समितीच्या आपल्या दहा सदस्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी तीन तास अगोदरच एका हॉटेलमध्ये बसविले होते़
भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची वारंवार चर्चा होत आहे. नुकत्याच सांगली महापालिकेत पार पडलेल्या निवडणुकीत, बहुमत असूनही भाजपला ऐनवेळी सदस्य गैरहजर राहिले होते. मते फुटल्याने महापौर व उपमहापौरपद गमवावे लागले होते़ या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपने स्थायी समितीच्या निवडणुकीत हेमंत रासने यांची अध्यक्षपदी ‘हॅट्ट्रिक’ करण्यासाठी, पक्षाच्या नगरसेवकांना कायदेशीर प्रक्रिया करून ‘व्हिप’ बजाविला होता़ याचबरोबर स्थायी समिती सदस्यांच्या वारंवार बैठका घेऊन, निवडणुकीच्या वेळी रासने यांनाच मतदान करणे व वेळेत उपस्थित राहण्यासाठी सूचित केले होते़ तरीही आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याच्या कार्यालयातून फोनाफोनी चालू होती़ एक एका सदस्याला चार-चार वेळा फोन करून उपस्थितीबाबत सूचना करण्यात येत होत्या़
एवढे करूनही न थांबता, शिक्षण समितीच्या निवडणुकीनंतर दुपारी बारा वाजताच भाजपच्या सर्व स्थायी समितीच्या सदस्यांना व प्रमुख पदाधिकाऱ्यांना घुले रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जमण्याचे फर्मान सोडण्यात आले़ येथे पुन्हा बैठक घेऊन संबंधितांच्या जेवणावळी घातल्या गेल्या़ तसेच त्या ‘व्हिप’ची आठवण करून देण्यात आली़ पक्षाचा आदेश झुगारला तर नगरसेवक पदही जाणार तसेच पुढील सहा वर्षे निवडणूकही लढविता येणार नाही आदी गोष्टी त्याही कायद्याची मोहोर उमटूनच होणार असल्याची आठवणही या वेळी करून देण्यात आली़
अखेर अडीचच्या सुमारास या दहा सदस्यांना एकत्रच हॉटेल बाहेर बोलावून एका मागोमाग एका गाडीतून महापालिकेत आणण्यात आले़ एवढे सोपास्कार केल्यानंतर अखेर दुपारी साडेतीनच्या सुमारास रासने यांची भाजच्या दहा सदस्यांच्या मतांवर विजयाची हॅट्रिक केली आणि त्या पदाधिकाऱ्यांनीºमोहीम फत्ते म्हणून नि:श्वास सोडला़
------------------------------------------
फोटो तन्मयने काढले आहेत़