चतुश्रृंगीला रोप वे नव्हे तर सरकता जिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 08:57 PM2018-10-03T20:57:44+5:302018-10-03T21:02:07+5:30
चतुश्रृंगी देवी येथे जमीन भुसभुशीत असून रोप वे न करता मंदिरापर्यत सरकता जिना तयार करण्यात येणार आहे...
पुणे : श्री चतुश्रृंगी देवी ट्रस्टच्यावतीने देवीकरिता दीड किलो वजनाचा नवीन सोन्याचा मुकूट तयार करण्यात आला आहे. तसेच ज्याठिकाणी रोप वे निर्मिती करायची आहे. त्याजागी टेकडीची उंची 100 मीटरपेक्षा कमी असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. तेथील जमीन भुसभुशीत असून रोप वे न करता मंदिरापर्यत सरकता जिना तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुहास अनगळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
10 आॅक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून तो उत्सव 18 आॅक्टोबरपर्यत चालणार आहे. घटस्थापना बुधवारी (10) सकाळी आठ वाजता होणार आहे. यावेळी सकाळी सहा ते 9 वेळेत अभिषेक,रुद्राभिषेक,महापुजा,महावस्त्र अर्पण केले जाणार आहे. पौरोहित्याची जबाबदारी नारायण कानडे गुरुजी पार पाडणार आहेत. नवरात्रोत्सवाकरिता चतुश्रृंगी ट्रस्टच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली असून त्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. याविषयी माहिती देताना अनगळ म्हणाले, मंदिराच्या जिर्णोधाराचे काम सुरु करण्यात येणार आहे. यंदाच्या उत्सवात स्तनपान कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. केरळमधील पुरग्रस्तांकरिता ट्रस्टच्यावतीने एक लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे. सध्या मंदिराच्या परिसरातील रंग रंगोटीची कामे अंतिम टप्यात आली असून सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा व मंदिराच्या परिसराचा देखील विमा काढण्यात आला आहे. उत्सवकाळात स्वच्छतेकरिता व आरोग्याची सुरक्षा यासाठी महापालिकेच्यावतीने कीटकनाशकांची फवारणी, कचरा उचलण्याकरिता जादा कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे.
कुठलाही अनुचित प्रकार उत्सवादरम्यान घडू नये यासाठी 20 सीसीटीव्ही कँमेरे लावण्यात आले आहेत. व्यवस्थापक सहाय्यसाठी अनिरुध्द सेवा केंद्राचे 150 स्वयंसेवक, भाविकांना दर्शन घेवून लवकर बाहेर पडता यावे याकरिता बँरिकेटची व्यवस्था आणि पोलीस,होमगार्ड, खासगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याचे कार्यकारी विश्वस्त दिलीप अनगळ यांनी सांगितले. याशिवाय पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामुल्य पार्किंग, भाविकांसाठी रुग्णवाहिका, यात्रेत रांगेत उभे राहणा-या भक्तांकरिता पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.