Kavach Technology: मध्य रेल्वेतील एकाही इंजिनमध्ये नाही सुरक्षा ‘कवच’; कशी काम करते ही यंत्रणा?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 08:17 AM2023-06-05T08:17:36+5:302023-06-05T08:23:15+5:30
देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही...
पुणे :पुणेरेल्वे विभागासह मध्य रेल्वेच्या एकाही रेल्वेच्या इंजिनमध्ये अथवा सेक्शनमध्ये ‘कवच’ (ट्रेन कोलेजन अव्हॉइड सिस्टम) ही यंत्रणा अद्याप बसवण्यात आलेली नाही. रेल्वे प्रशासनाने दिल्ली-मुंबईसहमुंबई-चेन्नई मार्गावर ‘कवच’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्षात ही यंत्रणा बसवण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. सध्या केवळ दक्षिण मध्य रेल्वेच्या १२०० किलोमीटर मार्गावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही.
दि. २ जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वेस्थानकाजवळ शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन रेल्वेगाड्यांना भीषण अपघात झाला. या अपघातात २८८ प्रवासी ठार झाले, तर १ हजार १७५ जखमी झाले. देशातील गेल्या २० वर्षांतील हा सर्वांत मोठा रेल्वे अपघात नुकताच घडला. यानंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली. रेल्वे अतिवेगाने, सिग्नल ओलांडून गेल्याने, तसेच एकाच रुळावर समोरासमोर येऊन हा अपघात घडला. अशा प्रकारच्या रेल्वे अपघातांना आळा बसावा म्हणून २०१२ साली रेल्वेत ‘टिकास’विषयी चाचणी झाली. नंतरच्या काळात त्याचे नामकरण ‘कवच’ असे करण्यात आले. २०२२ मध्ये रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सिकंदराबाद येथे कवच चाचणी केली होती. चाचणी यशस्वी ठरल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण मध्य रेल्वेच्या बीदर-परळी वैजनाथ-परभणी, मनमाड-परभणी-नांदेड, सिकंदराबाद-गडवाल-गुंटकल सेक्शनमध्ये कवच बसवण्यात आले, तसेच या मार्गावरून धावणाऱ्या ६५ इंजिनांमध्येही त्याचे डिव्हाइस बसवण्यात आले आहेत.
असे आहे ‘कवच’...
- लोको पायलट ब्रेक लावू न शकल्यास स्वयंचलित ब्रेकद्वारे रेल्वेचा वेग नियंत्रित होतो.
- ही यंत्रणा रेल्वेच्या गतीवर, हालचालीवर सतत लक्ष ठेवते आणि त्याचे सिग्नल पाठवत राहते.
- कोणतीही दुर्घटना घडल्यास जवळपासच्या रेल्वेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एसओएस’चे फीचर थेट लोको ते लोको संवादाद्वारे टक्कर टाळणे.
- लेव्हल-क्रॉसिंग गेट्सवर आपोआप शिटी वाजणे.
फायदा काय..
याचा सर्वाधिक फायदा हा सिंगल लाइन सेक्शनमध्ये होतो. एकाच रुळावर दोन गाड्या आमने-सामने अथवा एका पाठीमागे एक अशा धावत असल्यास त्या एकमेकांना धडकून अपघात होऊ नये, म्हणून या यंत्रणेचा वापर होतो. यामुळे दोन गाड्यांमध्ये किमान दोन किलोमीटरचे अंतर राखणे शक्य होते. परिणामी, दोन किलोमीटर आधीच गाड्या थांबतात. यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. शिवाय सिग्नल लाल असताना रेल्वे पुढे जाणे, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी धावणे या कारणांमुळे होणारे अपघात रोखता येतात.
मध्य रेल्वेच्या कोणत्याही विभागात ‘कवच’ यंत्रणा नाही. येत्या काळात मध्य रेल्वेच्या इंजिनला ही यंत्रणा बसवली जाईल.
- शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई