ना शाळा, ना परीक्षा, २० लाख विद्यार्थ्यांना ‘ढकलले’ पुढच्या वर्गात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:08 AM2021-06-24T04:08:56+5:302021-06-24T04:08:56+5:30
राहुल शिंदे पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दहावी-बारावी ...
राहुल शिंदे
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दहावी-बारावी सोडून सर्वच विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, दहावी-बारावीचे विद्यार्थीसुद्धा नापास होणार नसल्याचे राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या निकालाच्या सूत्रावरून दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २० लाख ३५ हजार विद्यार्थी शाळेत न जाता आणि परीक्षा न देता उत्तीर्ण होणार आहेत.
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. केवळ जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्याच नव्हे तर खासगी अनुदानित व खासगी विनाअनुदानित शाळांची संख्याही खूप मोठी आहे. जिल्ह्यात एकूण ७ हजार ४५५ शाळा असून त्यात इयत्ता पहिली ते बारावीचे २० लाख ३५ हजार ८०७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, कोरोनामुळे वर्षभर अनेक शाळाच सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून त्यांची परीक्षा घेणेही शक्य नव्हते. त्यामुळे शासनाने सर्वांना पुढच्या वर्गात ढकलले आहे.
चौकट
“शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला अडसर लागला आहे. आभासी शिक्षणामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळली असून विद्यार्थी-शिक्षक संवाद थांबला आहे. म्हणजेच अंतरक्रियेवरही परिणाम झाला आहे. शिक्षणात अंतरक्रियेला खूप महत्त्व आहे. वर्गातील शिक्षणाला दुसरा पर्यायच नाही. प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही तोपर्यंत शिक्षण क्षेत्रात आलेली निष्क्रियता दूर होणार नाही.”
-गोविंद नांदेडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
चौकट
‘ग्रामीण-शहरी’ यांच्यात दरी
“शहरात भौतिक सुविधा असल्याने शिक्षण प्रक्रिया सुरू होती. मात्र, ग्रामीण भागात लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांना काही काळ मोबाइल मिळाला. अनलॉक सुरू झाल्यावर पालक कामानिमित्ताने घराबाहेर पडले. त्यामुळे मुलांना मोबाईल मिळणे बंद झाले. आर्थिक परिस्थिती बिघडल्याने काहींना मोबाईल इंटरनेट रिचार्ज करता आले नाही. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचले किंवा नाही हे शिक्षकांना समजले नाही. परिणामी ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दरी निर्माण झाली.”
- महेंद्र गणपुले, प्रवक्त, मुख्याध्यापक संघ
चौकट
“ऑनलाइन शिक्षणाकडे हौस म्हणून पाहिले जात होते. परंतु,या पद्धतीला आता अध्ययन अध्यापनात नियमित शिक्षणात स्थान द्यावे लागेल हे समजले. ऑनलाईनमुळे शिक्षक व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कमी खर्चात व वेळेच्या बचतीमध्ये करणे शक्य झाले. तंत्रात बदल झाला. परंतु, शिक्षण पद्धती जुनीच राहिली. येत्या काळात यात बदल करावा लागेल.”
-वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
चौकट
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा - ४ हजार २१०
खासगी अनुदानित शाळा - १ हजार ३४६
खासगी विनाअनुदानित शाळा - १ हजार ८५७
एकूण शाळा - ७ हजार ४५५
एकूण विद्यार्थी - २० लाख ३५ हजार ८०७
चौकट
कुठल्या वर्गात किती विद्यार्थी?
पहिली - १ लाख ९० हजार ६१
दुसरी -१ लाख ९२ हजार ५९२
तिसरी -१ लाख ९० हजार १३७
चौथी -१ लाख ९० हजार ५७५
पाचवी -१ लाख ८६ हजार ९९६
सहावी -१ लाख ८३ हजार २१४
सातवी -१ लाख ७७ हजार ८७३
आठवी -१ लाख ७० हजार ८२२
नववी - १ लाख ६७ हजार ८६२
दहावी - १ लाख ४४ हजार ३८४
अकरावी -१ लाख २३ हजार ४३
बारावी -१ लाख १८ हजार २४८