Devendra Fadnavis: महिला आणि बालकांच्या गुन्ह्यात समझोता नको, जर कोणी पोलीस आढळल्यास बडतर्फ- फडणवीसांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 16:55 IST2024-10-11T16:53:22+5:302024-10-11T16:55:54+5:30
पुणे शहरात प्रचंड वेगाने नागरीकरण होऊ लागल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे

Devendra Fadnavis: महिला आणि बालकांच्या गुन्ह्यात समझोता नको, जर कोणी पोलीस आढळल्यास बडतर्फ- फडणवीसांचा इशारा
पुणे: राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. पॉक्सोच्या केसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रग्सच्या केसेसही बाहेर येऊ लागल्या आहेत. समाजात गुन्हेगारी प्रवूत्ती आहे. तोपर्यंत गुन्हे घडत राहतील. मात्र पोलिसांनी महिला आणि बालकांच्या गुन्ह्यात समझोता नको. तसेच अमली पदार्थ गुन्ह्यात जर कोणी पोलीस आढळला तर बडतर्फ केले जाईल असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत मंजूर झालेल्या नवीन सात पोलिस ठाण्यांचे उदघाटन शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, पुणे हे अर्थव्यवस्थाचे इंजिन आहे, प्रचंड वेगाने नागरीकरण होणारे शहर आहे. शहरात आव्हाने वाढत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. पोलीस आस्थापना बाबतीत 1960 साली निर्णय झाला. जवळपास 63 वर्षांनी नवीन आकृती बंध तयार केला. नवीन पोलीस ठाणे आम्ही तयार करत नव्हतो. 2014 पासून ते मी काम केले. पुण्यात हा मोठा रेकॉर्ड आहे की 7 पोलीस ठाणे उद्घाटन केली आहेत. गुणात्मक पोलिसिंग आपण करतो आहोत. सीसीटीव्ही फेज 2 उद्घाटन करतो आहे. आपण सेफ शहरासाठी काम केले आहे. नवीन कॅमेरे लागल्याने फायदा होणार आहे.
सायबर सुरक्षा आता महाराष्ट्र मध्ये अत्याधुनिक मशीन बसवले आहेत. त्यामुळे विविध सायबर गुन्हे उघडकीस येणार आहे. आरोपी पकडण्यासाठी खूप तंत्रज्ञान वापरावे लागले. तुम्ही जर फीड दिला तर व्यक्ती सापडू शकेल, सायबर सेंटरमध्ये तयार केली आहे. सर्व कॅमेरे एकत्रीकरण करणे गरजेचे आहे. ड्रोन कॅमेरे देखील आता वापरले जाणार आहेत. ब्लॅक स्पॉट वर नाईट व्हिजन कॅमेरा लावता येतील त्यासाठी प्रयत्न करायला हवा. वाहतूक खूप असून पुण्याला ऍडिशनल सिपी, एक डीसीपी देणार आहे. पुणे- पिंपरी चिंचवड मध्येही पोलीस आयुक्तालय वेगाने तयार करणार. 40 हजार पोलीस भरती झाली आहे, माझ्या काळात सर्वात जास्त भरती केली. त्यामुळे पोलिसांमध्ये कमतरता राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
ही आहेत नवीन सात पोलिस ठाणे...
आंबेगाव, नांदेडसिटी, बाणेर, खराडी, वाघोली, फुरसुंगी आणि काळेपडळ ही नवीन सात पोलिस ठाणी शुकवारपासून सुरू होत आहेत. पोलिस आयुक्तालयातील भारती विद्यापीठ, सिंहगडरोड, चतुःशृंगी, लोणीकाळभोर, लोणीकंद, हडपसर, वानवडी, कोंढवा, चंदननगर तसेच पुणे ग्रामीणमधील हवेली या दहा पोलिस ठाण्यांचे विभाजन करून ही नवीन पोलिस ठाणी सुरू होत आहेत.