Shivsena | ‘शिंदे गट नको, शिवसेना म्हणा’; काय आहे पत्रात?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:16 PM2023-02-21T19:16:29+5:302023-02-21T19:19:25+5:30
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय असे नाव असलेल्या लेटरहेडवर शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविले आहे....
पुणे : पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांसह संघटनात्मक पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. आता शिंदे गट नाही, तर शिवसेना म्हणा, असे पत्रच त्यांनी सर्व प्रसिद्धीमाध्यमांना पाठविले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय असे नाव असलेल्या लेटरहेडवर शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविले आहे. त्यावर आनंद आश्रम श्री भवानी चौक टेंभी नाका, ठाणे (प.) १ असा पत्ता आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी दिलेल्या निकालानुसार, यापुढे वृत्तांकन करताना शिंदे गट असे न संबोधता फक्त शिवसेना असा उल्लेख करावा, अशी विनंती पत्रात केली आहे. या पत्राच्या प्रती राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठविण्यात आल्या असून, स्थानिक स्तरावरील प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना ते पाठविण्याविषयी कळविण्यात आले आहे.
पत्रात काय आहे?
शिवसेना हेच पक्षाचे नाव आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे. त्याचा उल्लेख फक्त ‘शिवसेना’ असाच करणे योग्य आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आयोगाने तात्पुरते, निकाल देण्यापूर्वीची व्यवस्था म्हणून दिले होते. आता निकाल शिंदे यांच्या बाजूने लागल्यामुळे यापुढे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असा उल्लेख करणे अयोग्य ठरेल, असे मत राज्याच्या युवासेनेचे सचिव किरण साळी यांनी व्यक्त केले.