ना सॉकेट, ना पिन, तरीही कारागृहात गुन्हेगार करतात मोबाइल चार्ज; येरवडा कारागृहातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:42 AM2023-05-22T10:42:07+5:302023-05-22T10:43:07+5:30
कारागृहातील गुन्हेगाराकडे मोबाइल सापडल्यानंतर ही मोबाइल चार्जिंगची धोकादायक पद्धत उघड झाली आहे...
पुणे : कारागृहात मोबाइल नेण्यास बंदी असतानाही गुन्हेगारांकडे मोबाइल आढळून येण्याच्या घटना समोर येत आहेत. कैद्यांच्या बॅरेकमध्ये मोबाइल चार्ज करण्यासाठी ना सॉकेट ना पिन तरीही ते मोबाइल चार्ज कसे करतात? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, पण यावर गुन्हेगारांनी अफलातून, परंतु अतिशय धोकादायक पद्धत शोधून काढली आहे. कारागृहातील गुन्हेगाराकडे मोबाइल सापडल्यानंतर ही मोबाइल चार्जिंगची धोकादायक पद्धत उघड झाली आहे.
अश्विन आनंदराव चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत तुरुंग अधिकारी अमोल जाधव (वय ३७, रा.लोहगाव) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक १, बॅरेक क्रमांक १ मध्ये शुक्रवारी रात्री दोन वाजता घडला.
याबाबतची माहिती अशी, पिंपळे गुरव परिसरात भरदिवसा गोळीबार करून योगेश जगताप यांचा खून करण्यात आला होता. त्यातील आरोपी हे चाकण परिसरातील कोये गावी असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली होती. पोलिस आल्याचे समजताच, आरोपींनी गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तेथील पडलेले झाड उचलून आरोपींच्या अंगावर फेकले होते. त्यावेळी तिघा आरोपींना पकडण्यात आले. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात बंदिस्त आहेत.
याबाबत येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितले की, कारागृहात मोबाइल असल्याची कुणकुण होती. तशा सूचना वॉर्डनला दिल्या होत्या. कारागृहातील बॅरेक क्रमांक १ मधील खिडकी क्रमांक २ मध्ये गस्त घालणाऱ्या वॉर्डनला मध्यरात्री २ वाजता एक मोबाइल आढळून आला. त्यात बॅटरी व सिम कार्डही आढळून आले. कारागृहात बंदी असतानाही हा मोबाइल अश्विन चव्हाण याने आणल्याचे आढळून आल्याने, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करीत आहेत.
असा केला जात असे मोबाइल चार्ज
कारागृहातील बॅरेकमध्ये ट्युबलाइटसाठी वायरिंग करण्यात आली आहे. ही वायर कट करून त्यास वायर जोडून त्याला मोबाइल चार्जिंग करायची वायर जोडली जाते. त्याद्वारे मोबाइल चार्ज केला जातो. ही कट केलेली वायर इतरत्र संपर्कात आली, तर त्यातून अनेकांना विजेचा धक्का बसण्याचा धोका आहे.
मोबाइल जॅमर बंद
कारागृहाच्या आवारात पूर्वी मोबाइल जॅमर लावले होते, परंतु त्याच्यातून रेडिएशन मोठ्या प्रमाणावर होते. त्याचा त्रास होण्याचा धोका असल्याची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे गेल्या होत्या. त्यातून जॅमरची फ्रिक्वेन्सी कमी ठेवण्यास सांगण्यात आले होते. येरवडा कारागृहात अनेक झाडी, अडथळे आहेत. त्यामुळे मोबाइल जॅमर बंद पडते. त्यामुळे सध्या जॅमरचा वापर केला जात नाही.
- स्वाती साठे, उपमहानिरीक्षक, कारागृह, पुणे.