मनोज जरांगे-पाटलांच्या सभांना विशेष परवानगी नाही, नियम मोडला तर कारवाई : गिरीश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:47 PM2023-11-25T12:47:01+5:302023-11-25T12:47:49+5:30
रात्री - अपरात्री सभा होत असतील तर यात पोलिस प्रशासन लक्ष घालेल. नियमबाह्य कार्यक्रम होणार नाही, याची सरकार काळजी घेईल, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले...
पुणे : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भविष्यातही तसेच होईल. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. मनोज जरांगे - पाटील यांच्या रात्रीच्या सभांना सरकार कशी परवानगी देते, असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला आहे. मात्र, जरांगे - पाटील यांच्या सभांना विशेष परवानगी दिली गेली नाही. असे कुठेही घडलेले नाही. नियम मोडला असेल तर कारवाई होईल. रात्री - अपरात्री सभा होत असतील तर यात पोलिस प्रशासन लक्ष घालेल. नियमबाह्य कार्यक्रम होणार नाही, याची सरकार काळजी घेईल, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालकांसाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाजन शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एकनाथ खडसेंच्या आजारपणाबाबत शंका व्यक्त केल्यानंतर खडसेंनी गिरीश महाजन यांच्याबद्दल एक ट्विट केले आहे. त्याबद्दल विचारले असता, महाजन म्हणाले, खडसेंचा विषय बंद झाला आहे. त्यांच्याविषयी बोलायच म्हटलं तर ते खालच्या पातवळीवर जाऊन बोलतात. त्यांना कंबरेखालची भाषा जास्त आवडते. त्यामुळे मी त्यांच्याविषयी बोलणं सोडलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदूहृदयसम्राट असे बॅनर राजस्थानमध्ये लागले आहेत. त्यावर बाेलताना ते म्हणाले, राजस्थानमधील कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात ते बॅनर लावले आहेत. शिंदे यांनी काही स्वत: ते बॅनर लावले नसून ते स्वत: कधीही हिंदूहृदयसम्राट बोलणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील आणखी एक व्हिडीओ संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलावे. ते भडकपणे बोलत असतात. असंबंधित बोलत असतात. बावनकुळे कुटुंबीयांसमवेत तेथे गेले आहेत. प्रत्येकाचे खासगी जीवन आहे. तिथपर्यंत जाणे योग्य नाही. नितेश राणे यांनी संजय राऊत यांना पनवती म्हंटले म्हणजे शिवसेनेची आज जी दुरवस्था झाली, त्याला कारणीभूत कोण आहे. तेच आहेत. यालाच पनवती म्हणतात, असेही महाजन म्हणाले.
सुळेंची अवस्था पाण्यातून काढलेल्या माशासारखी
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीने महाराष्ट्र सरकार मागे नेण्यास सुरू केले आहे. तिघांनाही अमित शहांकडे जावे लागते. राज्याचे सर्व निर्णय दिल्लीतून होतात, कॅबिनेटमध्ये वादावादी होते, अशी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, कॅबिनेटमध्ये कधीही वादावादी झाली, असे दिसत नाही. मला वाटतं विरोधी पक्ष म्हणून सुळेंना बोलायला लागतं. त्यांची अवस्था पाण्यातून काढलेल्या माशासारखी झाली आहे. त्यांची तडफड होत आहे. तिन्ही पक्ष एकत्र आहोत. कुठेही वाद होत नाही. एकमताने निर्णय होत आहेत. दिल्लीला मोठा निधी, योजना असतात, काही राजकीय गोष्टी बोलण्यासाठी त्या ठिकाणी जावे लागते. त्यांच्या पोटात का दुखतं, मला कळत नाही. त्यांचा पक्ष खूप छोटा राहिला आहे. भाजप मोठा पक्ष आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीत आहेत, कार्यालय तेथे आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी, योजना आणण्यासाठी तेथे जावे लागत असेल तर सुळेंना वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही.