मृत्यूनंतरही पाऊस सोडेना पाठ..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 07:27 PM2019-10-10T19:27:45+5:302019-10-10T19:36:31+5:30
हातात धरून बांधली तिरडी : दु:खातही लोकांच्या मदतीसाठी धावला मुलगा..
लक्ष्मण मोरे-
पुणे : एकीकडे अंत्यविधीची तयारी सुरू होती... दुसरीकडे मुसळधार पावसामुळे पाणी घरात घुसायला सुरुवात झाली... वयोवृद्ध आईच्या उशाला बसलेल्या मुलाला काय करावे सुचेना... अशातच आसवांना बांध घालून नातेवाईकांनी मृतदेह हातामध्ये उचलून घेतला... तोवर घरातील पाण्याची पातळी वाढली... नाइलाजाने मृतदेह हातामध्ये धरूनच तिरडी बांधावी लागली...
शिवदर्शन येथील भारत तेलंग या सामाजिक कार्यकर्त्याच्या कुटुंबाला या दु:खदायक प्रसंगाला बुधवारी सामोरे जावे लागले. तेलंग यांनी दोन आठवड्यांपूर्वी सहकारनगर, अरण्येश्वर, टांगेवाले कॉलनी परिसरात आलेल्या पुरादरम्यान मदत व बचाव कार्यात हिरिरीने सहभाग घेतला होता. अनेकांना सुखरूप बाहेर काढून नागरिकांचे संसार वाचविण्यासाठी तेलंग अन्य कार्यकर्त्यांसोबत अहोरात्र झटत होते. बुधवारी त्यांनाच पावसाच्या पाण्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला.
तेलंग यांच्या आई वालम्मा आशन्ना तेलंग (वय ८०) यांचे बुधवारी निधन झाले. संध्याकाळी अंत्यविधी असल्याने नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाला होता. संध्याकाळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली. तसेच चेंबरमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर येऊ लागले होते. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसायला सुरुवात झाली. पाहता पाहता तेलंग यांच्याही घरामध्ये पाणी घुसले. खाली ठेवलेला मृतदेह नातेवाईकांनी उचलून घेतला. बाहेर फ्लेक्स बांधून केलेल्या आडोशामध्ये कॉटवर हा मृतदेह ठेवला. ही कॉटही पाण्याखाली जाऊ लागली होती. घरात आणि घराबाहेर पाणी असल्याने तिरडी कशी बांधायची, असा प्रश्न निर्माण झाला. अंत्यविधीसाठी आलेल्या नगरसेवक आबा बागूल, अमित बागूल यांच्यासह कार्यकर्त्यांनी हातामध्ये बांबू घेऊन तिरडी बांधली.
हे कमी की काय, रुग्णवाहिकेला पोहोचायला वाहतूककोंडीमुळे दीड तास उशीर झाला. रुग्णवाहिकेमधून मृतदेह वैकुंठ स्मशानभूमीत नेत असतानाही वाहतूककोंडीमुळे तब्ब्बल एक तास लागला. आईवर अंत्यविधी झाल्यानंतर तेलंग पुन्हा घरांमध्ये पाणी घुसलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावले. ‘माझी आई गेली असली तरी समाजातील माझ्या हजारो आयांना मदतीची गरज आहे. त्यासाठी मी कायम धावून जाणार,’ असे तेलंग म्हणाले.
.......