रेल्वे स्थानकांच्या इमारतीचे नाही ‘स्ट्रक्चरल ऑडिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:58+5:302021-05-29T04:09:58+5:30
पुणे : देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकांच्या इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झालेले नाही. केवळ इंजिनिअरिंग विभागाचे कर्मचारी (आयओडब्ल्यू) व अभियंता हे ...
पुणे : देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकांच्या इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झालेले नाही. केवळ इंजिनिअरिंग विभागाचे कर्मचारी (आयओडब्ल्यू) व अभियंता हे प्राथमिक स्तरावर इमारतीची तपासणी करून अहवाल देतात. मात्र इमारतींचे शास्त्रीय ‘ऑडिट’ होत नसल्याचे वास्तव आहे.
दोन दिवसांपूर्वी भुसावळ रेल्वे विभागात चांदणी स्थानकाच्या इमारतीचा काही भाग कोसळला. सन २००४ मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र, सोळा वर्षांतच ह्या इमारतीला तडे जाऊन त्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील इमारतींच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ची चर्चा ऐरणीवर आली आहे.
भुसावळच्या चांदणी स्थानकावर २६ मे रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी इमारतीचा काही भाग कोसळला. त्यावेळी कोणतीही गाडी चांदणी स्थानकातून जात नव्हती. ‘पुष्पक एक्स्प्रेस’ त्यादिवशी संध्याकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी चांदणी स्थानकावरून धावली. म्हणजेच घटनेनंतर ७९ मिनिटांनी धावली असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
चौकट
वेगाचा अन् इमारतीचा संबंध नाही
चांदणी स्थानकावरच्या घटनेचा आणि रेल्वे गाडीच्या गतीचा काहीही संबंध नाही. उत्तर रेल्वे विभागात ‘वंदे भारत’सारख्या रेल्वे गाड्या ताशी १४० ते १६० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. तिथे कधीच असा प्रकार घडला नाही. इमारतीचे बांधकाम नित्कृष्ट असल्याने हा अपघात घडला असणार आहे. कारणांचा शोध घेण्यासाठी रेल्वेने समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
चौकट
घटनेकडे दुर्लक्ष नको
तौक्ते वादळावेळी गुजरातमधील केवडिया स्थानकावरच्या छताचे मोठे नुकसान झाले. देशातले पाहिले वातानुकूलित स्थानक असलेल्या बंगळुरू स्थानकावरदेखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी गळत असल्याचे दिसले. भुसावळच्या चांदणी स्थानकावरची घटना घडली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरीही अशा घटनांकडे दुर्लक्ष होणे परवडणारे नाही.