लायसन्सची मुदत संपली टेन्शन नको, कोट्याशिवाय मिळेल परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:43+5:302021-09-22T04:12:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: परिवहन आयुक्तांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात होणारी गर्दी कमी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: परिवहन आयुक्तांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. यात शिकाऊ वाहन परवाना, योग्यता प्रमाणपत्र या कामांचा समावेश होता. ही मुदत संपत असल्याने आता अनेक परवानाधारकांना टेन्शन आले आहे. मात्र, पुणे आरटीओ कार्यालयाने विशेष कोटाअंतर्गत ज्यांच्या लायसन्सची मुदत ३० तारखेला किंवा त्याच्या आत संपत आहे, अशांना परवाना देण्याची सोय केली आहे. जर कोटामधून देखील परवाना मिळत नाही. त्यांनी थेट आरटीओ कार्यालय गाठावे. त्यांना कार्यालयात परवाना दिला जाईल.
पुणे आरटीओ कार्यालयात कायमस्वरूपाचा परवाना काढण्यासाठी दररोज ६०० कोटा ठरवून दिला आहे. त्याला आता जवळपास महिन्याभराचे वेटिंग आहे. मात्र, ज्या परवानाधारकाची परवान्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे अशासाठी पुणे कार्यालयाने विशेष कोटाची तरतूद केली आहे. या कोटाअंतर्गत रोज २५ जणांना परवाना दिला जाईल. ज्यांचे या कोटामध्ये देखील काम होणार नाही, अशा परवानाधारकांनी थेट आरटीओ कार्यालय गाठावे. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून वाहन चाचणी द्यावी. त्यामुळे परवानाधारकांनो टेन्शन घेऊ नका.
----------------------
तारीख मिळाली नाही तर :
पुणे आरटीओ कार्यालय ज्याच्या लायसन्सची मुदत ३० सप्टेंबरला संपणार आहे, त्यांच्यासाठी सात दिवस आधी म्हणजेच २३ सप्टेंबरपासूनच विशेष कोटा सुरू करीत आहे. ऑनलाईन पद्धतीने यांवर आपल्याला तारीख घेता येईल. यासाठी २५ परवान्याची मर्यादा ठेवली. ज्यांना यात देखील तारीख मिळाली नाही अशांची गैरसोय होऊ नये याकरिता आरटीओ कार्यालयात येऊन थेट टेस्ट देता येईल.
--------------------
रोजचा कोटा ६००
पुणे आरटीओ कार्यालयात वाहन परवान्यांचा कोटा ६०० इतका आहे. त्याचे देखील आता वेटिंग सुरू आहे. आता लर्निंग लायसन फेसलेस झाले आहे. त्यामुळे त्याला कोटाची गरज राहिली नाही. घरात बसून देखील लायसन्स काढता येत आहे. कायमस्वरूपी लायसन्ससाठी हा कोटा उपयोगी पडतो.
------------------------
ज्या परवानाधारकांच्या परवान्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे. त्यांनी विशेष कोटामध्ये अर्ज करावा. त्यात देखील त्यांचे काम झाले नाही तर त्यांनी थेट आरटीओ कार्यालयात यावे. त्यांची टेस्ट तिथेच घेतली जाईल.
- राजेंद्र पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.