कामात असल्याने राज्यपालांना स्वाक्षरीला नाही वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:49+5:302021-07-01T04:08:49+5:30
पुणे : “राज्यपाल महोदय कामात असतात. त्यामुळे त्यांना विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरी करायला वेळ नसेल,” अशी प्रतिक्रिया ...
पुणे : “राज्यपाल महोदय कामात असतात. त्यामुळे त्यांना विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरी करायला वेळ नसेल,” अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करायच्या १२ सदस्यांची यादी दिली. त्यात शेट्टी यांचे नाव असल्याची चर्चा आहे. मात्र, अनेक महिने झाले तरी राज्यपालांनी या संदर्भात निर्णय घेतलेला नाही. या संदर्भात विचारले असता शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते बुधवारी (दि. ३०) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
‘ज्यांनी जात काढली त्यांच्याबरोबर शेट्टी जातात,’ या भाजपच्या टीकेलाही शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, सत्ता नसल्याने भाजपाचे सगळे नेते कासावीस झाले आहेत. त्यांनी कोणाकोणाची जात काढली ते राज्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये. “ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट साखर उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झाली. साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार केला जातो, पण ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षातही घेतल्या जात नाहीत. याविषयी पवार यांच्याशी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनाही भेटून मागणी केली आहे,” असे त्यांनी सांगितले.