हडपसरमध्ये झाडे तोडणारा सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:38+5:302021-04-12T04:09:38+5:30
मोकळी जागा असो अथवा महापालिकेची या जागेत असणा-या झाडाची कत्तल हडपसर परिसरात केली जाते आहे. मात्र पालिकेला ते चोरटे ...
मोकळी जागा असो अथवा महापालिकेची या जागेत असणा-या झाडाची कत्तल हडपसर परिसरात केली जाते आहे. मात्र पालिकेला ते चोरटे सापडत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. गेले १५ दिवस झाले चोरी करणारा अथवा त्याचे नाव समजत नसल्याने गुन्हा कसा दाखल करायचा, असा सवाल उपस्थित झाला आहे.
काळेपडळ येथील नियोजित अग्निशामक दलाच्या इमारतीच्या मागील बाजूला पालिकेचा मोकळा प्लाॅट आहे. तेथे सर्व प्रकारची झाडे आहेत. जंगलच तयार झाले आहे. ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित आहे. तसा तेथे फलक लावण्यात आला आहे. फलक लावला म्हणजे ती जागा पालिकेची आहे, हे पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना माहिती आहे. त्या जागेत असलेले बाभूळ यासारखी झाडे बुंध्यापर्यंत तोडून तेथून नेण्यात आली आहेत. याबाबत पालिकेच्या कर्मचा-यानां माहिती आहे. मात्र चोर सापडत नाहीत, असे ते सांगतात.
झाडे तोडण्यासाठी पालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. शिवाय ती स्वमालकीची असणे महत्त्वाचे आहे. मात्र गेले अनेक दिवस एक व्यक्ती सोसायटीच्या मोकळ्या जागेतील व पालिकेच्या मोकळ्या जागेतील झाडाची कत्तल करून चोरी करत आहे. चांगल्या जातीचे झाडे तोडून त्याचे ओंढके पाडून टेम्पोने नेली जात आहेत. मात्र तो चोर काही पालिकेला सापडत नाही. अशा चोराची व त्याच्या संबंधित लागेबंध असणा-या अधिकारी व कर्मचा-याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
------------------------
या ठिकाणी झाडे तोडली आहेत. मात्र कोणी तोडली हे माहिती नाही. शोध सुरू आहे. सापडल्यानंतर त्यांच्यावर दाखल केला जाईल.
-ज्ञानोबा बालवडकर,
वृक्षनिरीक्षक, पुणे मनपा