टोमॅटोशिवाय भाजी नाही; किलोला १०० रुपये, दर वाढ ऐकून सामान्य झाले लालबुंद
By अजित घस्ते | Updated: June 23, 2024 15:37 IST2024-06-23T15:37:11+5:302024-06-23T15:37:49+5:30
स्वयंपाक घरातील महत्त्वाचा हा घटक असलेला टोमॅटो महागल्याने याचा फटका गृहिणींना बसतोय

टोमॅटोशिवाय भाजी नाही; किलोला १०० रुपये, दर वाढ ऐकून सामान्य झाले लालबुंद
पुणे: बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका टोमॅटोला बसला आहे. उत्पादन घटले आहे. उत्पादन घटल्याने नेहमीच्या तुलनेत आवक निम्मीच झाल्याने टोमॅटोचे भाव गगणाला भिडले आहेत. एरवी घाऊक बाजारात १० ते २० रुपये किलो भावाने विक्री होणाऱ्या टोमॅटोला आता ५० ते ६० रुपये भाव खाल्लाय. परिणामी, किरकोळ बाजारातही चढ्या भावाने टोमॅटोची विक्री होत आहे. पाव किलोला ३० रुपये मोजावे लागत आहे तर किलोला शंभरी भाव मिळत आहे. यामुळे सध्या लालबुंद टोमॅटोने भाव खाल्ला आहे. घरात प्रत्येक भाज्यांमध्ये टोमॅटो वापरला जातो. त्यामुळे स्वयंपाक घरातील महत्त्वाचा हा घटक असलेला टोमॅटो महागल्याने याचा फटका गृहिणींना बसत आहे. टोमॅटो सामान्यांचे बजेड सध्या कोलमडत आहे.
मार्केटयार्ड तरकारी विभागात रविवारी (दि. २३) ७ ते ८ हजार पेटी टोमॅटोची आवक झाली. ही आवक नेहमीच्या तुलनेत निम्मीच आहे. येथील बाजारात सोलापूर, सातारा, सांगलीसह पुणे जिल्ह्यातून होत आहे. हवामान बदलाचा परिणाम पिकावर झाला आहे. मागील काही दिवसात टोमॅटोची आवक घटत चालली आहे. त्यामुळे भावात तेजी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
बदलत्या हवामानाच टोमॅटोला फटका : मागील महिन्यात टोमॅटोचा भाव हा सर्वाना परवडेल असा होता. मात्र बदलत्या हवामानाच टोमॅटोला फटका बसल्याने लालबुंद टोमॅटोने भाव सध्य चांगलाच खाल्ला आहे. त्यामुळे रोजच्या वापरातील टोमॅटो सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे तर गृहिणी मात्र नाराज झाल्या आहेत.
सुरूवातीला पडलेली अति उष्ण्ता, त्यानंतर मान्सूनपूर्व पाऊसाने हजेरी लावल्याचा फटका टोमॅटोच्या पिकाला बसला आहे. परिणामी, उत्पादन घटले आहे. त्यामुळॆ आवक कमी होत असल्याने भावात तेजी आहे. या महिन्यात पालेभाज्यांचे सर्वच भावात तेजी राहिल. त्यात सर्वाधिक टोमॅटो ला भाव मिळत आहे. - विलास भुजबळ, ज्येष्ठ आडतदार, मार्केटया्र्ड.