पाणीकपात होऊ देणार नाही, पुण्यासाठी वाढीव पाण्याची मागणी करणार - महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 02:15 AM2017-11-12T02:15:51+5:302017-11-12T02:16:04+5:30
स्थानिक सुनावणीत जलसंपदा विभागाने काही आदेश दिला असेल. प्रशासन त्याविषयी पाहील; मात्र पुण्यात पाणीकपात होऊ देणार नाही. उलट, ११ गावांचा समावेश केल्यामुळे वाढीव पाण्याची मागणी करणार आहोत, त्यासाठी मंत्र्यांसमवेत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
पुणे : स्थानिक सुनावणीत जलसंपदा विभागाने काही आदेश दिला असेल. प्रशासन त्याविषयी पाहील; मात्र पुण्यात पाणीकपात होऊ देणार नाही. उलट, ११ गावांचा समावेश केल्यामुळे वाढीव पाण्याची मागणी करणार आहोत, त्यासाठी मंत्र्यांसमवेत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीनेही कोटा राज्य सरकारने ठरवून दिला असल्यामुळे त्यात कोणाला बदल करता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.
जलसंपदा विभागाकडे काही शेतक-यांनी पुण्यात जास्त पाणी वापरले जात असल्यामुळे शेतीला पाणी कमी मिळते, अशी तक्रार केली होती. तक्रारीच्या सुनावणीनंतर या विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी महापालिकेने पाण्यात साडेसहा टीएमसी पाणीकपात करावी, असा आदेश दिला.
पाण्याचा कोटा ठरवून दिलेला
पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘त्या सुनावणीत पालिकेच्या वतीने ग्रामपंचायतींना करावा लागणारा पाणीपुरवठा, लोकसंख्येत झालेली वाढ असे मुद्दे उपस्थित केले होते; मात्र ते दुर्लक्षित झाले. पुणे शहराला पाण्याची ११.५० टीएमसी हा कोटा सरकारने ठरवून दिला आहे. त्यामुळे अन्य कोणाच्या आदेशाने त्यात कपात वगैरे होणार नाही. कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी प्रशासन सातत्याने करीत आहे. आता गावांच्या समावेशामुळे या मागणीची पूर्तता होईल, असे दिसते आहे.’’
महापालिकेतील विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी २४ तास पाणी योजनेची गरज वाढावी, यासाठीच त्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली; त्याच दिवशी हा आदेशही दिला, अशी टीका केली. पाणीकपात झाली, की पुणेकरांची ओरड सुरू होईल व त्यांना आम्ही २४ तास पाणी देणार आहोत, असे सांगून योजना पुढे नेण्यात येईल, असा हा प्रकार असल्याचे सांगितले. आता सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पुणेकरांच्याच पाण्याला कात्री लावू पाहत आहे, असे तुपे म्हणाले.
महापालिकेला पाण्याचा कोटा राज्य सरकारने ठरवून दिला आहे. त्या आदेशाचे काय करायचे ते प्रशासन पाहील. आम्ही मात्र ११ गावांच्या समावेशामुळे पुुणे शहराचा पाण्याचा कोटा वाढवून मिळावा, अशीच मागणी सरकारकडे करून ती पूर्ण व्हावी,यासाठी प्रयत्न करणार आहोत.
-मुक्ता टिळक, महापौर