पुणे | 'काय त्यो रस्ता...काय त्यो कचरा...', फुरसुंगीत गेले बारा दिवस पाण्याचा पत्ता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 08:49 AM2022-07-13T08:49:42+5:302022-07-13T08:53:39+5:30
फ्लेक्स लावून प्रशासनाचा निषेध....
फुरसुंगी : फुरसुंगी परिसरातील परिस्थिती आता येथील नागरिकांनी फ्लेक्सद्वारे प्रशासनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. गेले बारा दिवस झाले पिण्याचे पाणी येत नाही. जे पाणी येते ते गढूळ काळे पाणी येत आहे. त्याला वैतागून येथील नागरिकांनी कर भरमसाठ भरून... काय ते पाणी... अशा प्रकारचे फ्लेक्स लावून प्रशासनाचा निषेध केला आहे.
फुरसुंगी गाव महापालिकेत समाविष्ट करण्यात आले. मात्र महापालिकेकडून मिळणाऱ्या सुविधा अपुऱ्या मिळत आहेत. मुख्य म्हणजे पाणी येथे पूर्वीपासूनच कचरा डेपोमुळे टँकरने पुरवले जात होते. मात्र त्याची संख्या ही कमी झाली आहे. तर काही भागात येतील विहिरीमधील नळ कोंडाळ्याव्दारे पाणीपुरवठा होतो. पण त्या पाण्यातही कालव्याला पाणी आल्यावरच होतो.
कालव्याच्या विसर्गमुळे येथील नागरिकांना पाणीपुरवठा होत असतो. मात्र कालव्यात पाणी नसले की या परिसराला पाणी मिळत नाही आणि सध्या जे १२ दिवसांनी पाणी येते तेही काळे पाणी येत असल्याने अजिंक्य ढमाळ, सचिन हरपळे, अमोल कापरे यांनी फ्लेक्स लावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याबाबत सासवड रस्त्यावर फलक लावून आम्हाला शुद्ध पाणी मिळेल का, याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.