गणेश विसर्जनाच्या दिवशीही मुठा नदीचं पात्र कोरडंच...!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 04:35 PM2018-09-23T16:35:09+5:302018-09-23T16:52:11+5:30
पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडुनही खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी शनिवारपर्यंत पुरेसे पाणीच सोडण्यात आले नव्हते.
खडकवासला: यंदाच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्वोच्च व उच्च न्यायालयाकडून डीजेवर बंदी घातल्यामुळे उत्साही मंडळांनाच आधीच चांगलाच दणका बसला. त्यामुळे राज्यातच गणेश मंडळांमध्ये नाराजीचा सूर उमटला असतानाच पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडुनही खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी शनिवारपर्यंत पुरेसे पाणीच सोडण्यात आले नव्हते. या पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता झाली होती.पण विभागाकडून रविवारी सकाळी मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले.
पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाला यंदाच्या गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा विसर पडल्याचा गंभीर आरोपच खडकवासला मतदार संघाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी केला. कोंडे म्हणाले, समस्त पुणेकर नागरिक व स्थानिक गणेशोत्सव मंडळांचे हे दुर्देवच म्हणावे लागेल. गणेश विसर्जनाच्या अगदी शेवटचे दिवसापर्यंत पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाला मुठा नदीत पाणी सोडण्यासाठी जागच आली नाही.याला पाटबंधारे खाते तसेच पुणे महानगरपालिका देखील जबाबदार आहे. उच्च न्यायालयाचे व प्रशासनाचे जातक निबंर्धांमुळे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या आनंदावर अगोदरच विरजण पडले असतानाच विसर्जनासाठी मुठा नदीत आवश्यक प्रमाणात पाणीच सोडले गेले नसल्याने शहर- उपनगरातील गणेश भक्त व मंडळे सुद्धा आता तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आजपर्यंत गणेश विसर्जनाच्या अगदी दोन तीन दिवस अगोदरच नदी पात्रात पाणी सोडले जात होते.मात्र, यंदा याचाही प्रशासनाला विसर पडला आहे.शनिवारी मध्यरात्रीपर्यंत नदीपात्रात पाणी सोडले गेले नाही तर शिवसेना पक्ष व गणेशोत्सव मंडळांच्या तीव्र रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही धावाधाव सुरू झाली.