उमदा कलाकार, संवेदनशील माणूस गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:14+5:302020-12-11T04:28:14+5:30
कलाकारांच्या भावना : अचानक एक्झिटने संगीत क्षेत्राचे नुकसान पुणे : उत्तम संगीतकार आणि संगीत संयोजक नरेंद्र भिडे यांचे निधन ...
कलाकारांच्या भावना : अचानक एक्झिटने संगीत क्षेत्राचे नुकसान
पुणे : उत्तम संगीतकार आणि संगीत संयोजक नरेंद्र भिडे यांचे निधन म्हणजे मोठा धक्का आहे. त्याच्या रुपाने आपण एक उमदा कलाकार आणि संवेदनशील माणूस गमावला आहे. त्याच्या कलेतून तो कायम आपल्या स्मरणात राहिल, अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या.
गायक अवधूत गुप्ते म्हणाले, ‘तीन दिवसांपूर्वीच ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या आगामी गाण्यात काही बदल करायचा असल्याने त्याची आणि माझी भेट झाली. आता कधीच त्याच्याबरोबर रेकॉर्डिंग करता येणार नाही. आयुष्य किती अनपेक्षित आहे, याची आज जाणीव झाली.’
‘‘श्याम रंग’ या अल्बममधील माझ्या आयुष्यातील सर्वात पहिले गाणे नरेंद्र काकाने संगीतबध्द केले होते. तेव्हा मी ६ वर्षांची होते. काही दिवसांपूर्वीच आम्ही गझलचा एक प्रकल्प केला. तो खूप हुशार संगीत संयोजक होता. त्याच्या प्रत्येक कामात परिपूर्णता असायची, अशा भावना गायिका आर्या आंबेकर हिने व्यक्त केल्या.
सावनी रविंद्र म्हणाली, ‘कारकिर्दीतील पहिले गाणे मी नरेंद्र दादासाठी गायले. त्याची कला कायम आपल्याबरोबर राहील. त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण कायम स्मरणात राहील.’
---------------
नरेंद्र भिडे हे अभिजात शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असलेले आघाडीचे संगीतकार होते. त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान कधीच विसरता येणार नाही. पुणेकरांच्या वतीने मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो.
- मुरलीधर मोहोळ, महापौैर
--------------
नरेंद्र भिडे हा आताच्या पिढीतील प्रतिभावंत संगीतकार होता. त्याच्या जाण्याने भावसंगीत आणि चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. शास्त्रीय संगीताची सुक्ष्म जाण, सखोल अभ्यास, वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न हे त्यांचे वेगळेपण कायम लक्षात राहील.
- पं. शौैनक अभिषेकी, शास्त्रीय गायक
--------------
आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये आमची ओळख झाली. कलेचा दर्जा उंचावत मराठी उद्योजक म्हणून त्याने महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत दोन्हीची त्याला उत्तम जाण होती. भाषेवर प्रभुत्व ही आणखी एक जमेची बाजू. जगण्याची प्रचंड उर्मी असलेला हा मित्र या जगात नाही, हे मानायला अजूनही मन तयार नाही.
- डॉ. सलील कुलकर्णी, गायक
------------
नरेंद्र भिडेच्या निधनाने संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. तो केवळ उत्तम संगीत संयोजक किंवा संगीत दिग्दर्शक नव्हता, तर मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी धडपडणारा अवलिया होता. रंगा पतंगा, लेथ जोशी अशा चित्रपटांना त्याने चांगले पाठबळ दिले.
- कौैशल इनामदार, गायक
------------
बबड्या गेला. मी दिग्दर्शित केलेल्या ‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’ या तिन्ही चित्रपटांचा संगीतकार नरेंद्रच होता. बुध्दिमान, हस-या व्यक्तिमत्व असणारा संगीतकार आपल्याला सोडून गेला.
- प्रवीण तरडे, अभिनेता आणि दिग्दर्शक
-------
तो अतिशय गुणी आणि बुध्दिमान संगीतकार होता. डॉन स्टुडिओशी सर्वच कलाकारांशी जवळचे नाते आहे. त्याच्या जाण्याबद्दलच्या भावना शब्दांत व्यक्त करताच येणार नाहीत.
-आनंद भाटे, गायक
--------------
त्याचे जाणे खूप धक्कादायक आहे. उत्तम संगीतकार, संगीत संयोजक आणि संवेदनशील व्यक्तिमत्व असे त्याचे वर्णन करावे लागेल. आम्हा कलाकारांना त्याची उणीव कायम जाणवेल.
- राहूल गांधी, गायक
----------------------
माणूस त्याच्या कार्यातून कायम जिवंत राहतो. मला खूप वेळा नरेंद्रकडे गाण्याची संधी मिळाली. अनेक प्रोजेक्ट करता आले. त्याची कामाची खासियत वेगळीच होती. परवाच त्याच्याशी आठ प्रहरांमधील गाण्याबद्दल बोलणे झाले होते. त्याच्या कामातून त्याचे अस्तित्व कायम आपल्या मनात राहील.
- सावनी शेंडे, गायिका
------
नरेंद्रबरोबर अनेक वर्षे खूप काम केले आहे. त्याची एक्झिट सुन्न करणारी आहे. उमदा कलाकार आज आपल्याला सोडून गेला आहे.
- बेला शेंडे, गायिका