'तुम्ही खासदार, आमदार, पळवाल; पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही'-सचिन अहिर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 02:21 PM2022-07-24T14:21:48+5:302022-07-24T14:21:56+5:30
उद्धव ठाकरेंनी देशात नव्हे तर जगात आदर्श मुख्यमंत्री म्हणून नाव कमावले
सासवड : शिवसेनेला संपवण्याची जो भाषा करतो तो स्वतःच संपतो हा इतिहास आहे, असे सांगत नव्या उमेदीने कामाला लागा व भगवा घराघरांत पोहोचवा, असे आवाहन करत आमदार सचिन अहिर म्हणाले, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत विविध संकटांवर मात करत राज्याचा कारभार नेटाने चालवला. देशात नव्हे तर जगात आदर्श मुख्यमंत्री म्हणून नाव कमावले. हिंदुत्व हाच आमचा विचार आहे असे धाडसाने सांगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी तुम्ही कट केला. तुम्ही खासदार, आमदार, माजी आमदार पळवाल, पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही, असे परखड मत पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन अहिर यांनी सासवड येथे मांडले आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिन अहिर यांनी विजय शिवतारे यांच्यावर सडकून टीका केली. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, बाळासाहेब चांदेरे, उल्हास शेवाळे, माजी तालुकाध्यक्ष ॲड. प्रदीप धुमाळ, रामदास झगडे, हवेलीचे शंकर नाना हरपळे, संदीप मोडक (धाडशी), विलास जगताप, रमेश जाधव, अभिजित जगताप, राजेंद्र जगताप, सोमनाथ खळदकर, प्रसाद खंडागळे तसेच पुरंदर हवेलीतील शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी सचिन अहिर यांनी शिवतारे यांच्यावर कडाडून टीका केली. तुमच्यात हिम्मत होती तर पक्षाचे राजीनामे देऊन बाहेर का पडला नाही, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेला साथ देण्याऐवजी जिथे जाईल तिथे मिठाचा खडा टाकण्याचे काम केले. बापू तुम्ही कौटुंबिक नात्यालासुध्दा जागला नाही. आम्हाला टांग लावून गेला, पण खऱ्या अर्थाने पुरंदरचे लॉकडाऊन उठले आहे. आता येथे कोणाला पास लागणार नाही. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांत तुमचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत शिवतारे यांचे अक्षरशः वाभाडे काढले.
जनतेच्या मनातील ठाकरेंचे हे सिंहासन पुन्हा वैभवाने परत मिळेल
गेली अनेक वर्षे पुरंदरशी निगडित असलेल्या शिवसेनेने विजय शिवतारे यांच्या प्रत्येक कामात सहभाग नोंदवला.. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सेनेचे अनेक पदाधिकारी यांनी त्यांच्या उपोषण, सामुदायिक विवाह सोहळा, प्रचारसभा आदींला हजेरी लावली.. साथ दिली पण त्यांनी स्वतःचे अपयश झाकत पक्षावर खापर फोडलं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. जनतेच्या मनातील ठाकरेंचे हे सिंहासन पुन्हा वैभवाने परत मिळेल, असे प्रतिपादन गोऱ्हे यांनी यावेळी केले.
...आणि तुम्ही पाठीत खंजीर खुपसला
आढळरावांनी जे केले तेच विजय शिवतारे यांनी केले, अशा शब्दांत शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांनी निशाणा साधला आहे. घरातील वाद मिटविण्यासाठी आणि स्वतःची कातडी वाचवण्यासाठी बंडखोरी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना हजारो महिला रडल्या. त्यांचे अश्रू तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. तुमच्यासाठी आम्ही हातात निखारा घेतला आणि तुम्ही पाठीत खंजीर खुपसला, असे सांगतानाच आता सर्वांनी राखेतून भरारी घेण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.