'सात जन्म घेतले तरी चंद्रकांत पाटलांना पवार साहेबांवरील पीएचडी पूर्ण करता येणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 05:17 PM2020-02-15T17:17:20+5:302020-02-16T09:22:14+5:30
कुणाचाही मनमानी कारभार खपवून घेणार नाही: धनंजय मुंडे
पुणे : सामाजिक मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बार्टी संस्थेत आलोय. सर्व गोष्टींचा आढावा घेत आहे. आत्तापर्यंत बार्टीबद्दल जे काही अनेक मुद्दे, तक्रारी माझ्याकडे आले आहेत, त्याची सखोल माहिती घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल. परंतु, या संस्थेत कुणाचीही मनमानी कारभार खपवून घेतली जाणार नाही, असे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील बार्टी संस्थेला धनंजय मुंडे यांनी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शनिवारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी संस्थेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुंडे म्हणाले, भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही हे वारंवार समोर आलंय, आणि त्यासाठी ते कुठल्या थराला जाऊ शकते हे सर्व जनतेनी पाहिलं आहे. त्यामुळे मध्यावधीची जी अफवा भाजप पसरवतेय त्याला काही अर्थ नाही. महापोर्टल बंद करण्याचा निर्णय शासन घेत आहे. त्याला पर्यायी यंत्रणा देत आहोत. सारथीबद्दल जी नाराजी पवार साहेबांनी व्यक्त केली ती जवळून पाहिलीय. अमरावती महाविद्यालयात प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्याचा जो प्रकार घडलाय त्याबाबत चौकशी करणार आहोत. चौकशीत एल्गारच्या बाबतीत कुठलाही भाग पुढे आलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार सत्याचा बाजूने चौकशी करत आहे.चंद्रकांत पाटलांना पवार साहेबांवर पीएचडी करायला सात जन्म घ्यावे लागतील तरी ती पूर्ण होणार नाही, पवार साहेबांना ओळखायला दहा जन्म घ्यावे लागतील.