खोदकाम मुदतीत पूर्ण न करणाऱ्यांची एनओसी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:59 AM2019-03-05T00:59:48+5:302019-03-05T00:59:50+5:30
विकासाची कामे खूप सुरू आहेत़ त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा होतो़ ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यास संबंधितांना वाहतूक पोलिसांकडून देण्यात येणारी एनओसी रद्द करण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तपंकज देशमुख यांनी सांगितले़
पुणे : शहरात विकासाची कामे खूप सुरू आहेत़ त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा होतो़ ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यास संबंधितांना वाहतूक पोलिसांकडून देण्यात येणारी एनओसी रद्द करण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तपंकज देशमुख यांनी सांगितले़
देशमुख यांची पुणे पोलीस दलात पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली़ त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी देशमुख यांच्यावर वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविली आहे़ देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला़
देशमुख यांनी सांगितले की, पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे़ नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी जनजागृती केली जाते़ यासाठी नागरिकांचेही सहकार्य घेण्यात येत आहे़ वाहतूक सुधारण्यासाठी नागरिक आणि वाहतूक कर्मचाऱ्यांकडून सूचना मागविण्यात येतील़ हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़
शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहतुकीला अडथळा होत असतो़ ही कामे अनेकदा रेंगाळतात़ महापालिकेने ठेकेदारांना काम पूर्ण करण्यासाठी कालावधी नेमून दिलेला असतो़ वेळेत कामे पूर्ण न करणाºया ठेकेदारांची एनओसी रद्द करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़
>रविवारी भाजपाने काढलेल्या दुचाकी रॅलीतील दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते़ त्याच्यावर कारवाईबाबत विचारले असता नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई होईल़ सीसीटीव्हीच्या माध्यमातून या रॅलीतील दुचाकीस्वारांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल़