पुण्यात फटाक्यांचा आवाज झाला कमी, जनजागृतीचे यश; विक्री निम्म्याने घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 03:45 AM2017-10-20T03:45:24+5:302017-10-20T03:45:37+5:30
फटाक्यांमुळे होणा-या प्रदुषणाबाबत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा फटाक्यांचा आवाज कमी झाला असून, नागरिकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
पुणे : फटाक्यांमुळे होणा-या प्रदुषणाबाबत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा फटाक्यांचा आवाज कमी झाला असून, नागरिकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यातच दिवाळीच्या मुहूर्तावर झालेला पाऊस, मंदी व निर्बंध यांमुळे यंदा फटाक्याची विक्री निम्याने घटली आहे.
अनेक वर्षे दिवाळी, त्यातही लक्ष्मीपूजनाची पहाट जोरदार फटाक्यांच्या आवाजानेच होते. शहराच्या मध्यवस्तीमध्ये सोसायट्यांच्या टेरेसवर फटाके फोडण्याचा धुमधडाकाच असायचा. फटाक्यांचा प्रचंड आवाज व प्रदूषण यांचे घातक परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहेत.
याबाबत जनजागृती झाल्याने गेल्या तीन-चार दिवसांमध्ये मध्यवर्ती पुण्यासह उपनगरातील सोसायट्यांमध्ये पहाटेच्या फटाक्यांचा आवाज चांगलाच कमी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रात्रीचे फटाकेही कमी झाले आहेत. फटक्यांचा आवाज कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले़
बलून, पॅरेशूट आकाश दिव्यांची खरेदी वाढली
दिवाळी हा रोषणाईचा सण. त्यामुळे वाढत्या पदूषणामुळे फटाक्याची विक्री कमी झाली असताना, बलून, पॅरेशूट आकाश दिव्याची खरेदी मात्र वाढली आहे. दिवे लावून बलूनने आकाशात सोडले जातात.
कोल्हापूरही फटाकेमुक्तीकडे
निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम कोल्हापुरात दिसत आहे. यंदा फटाक्यांचे प्रमाण कमी झाले असून पर्यावरणपूरक दिवाळीला कोल्हापूरकरांचा प्रतिसाद वाढत आहे. कोल्हापुरात काही निसर्गमित्र संस्था फटाके न वाजविणाºया मुलांसाठी निसर्गसहल काढतात. या संस्थेमार्फत विद्यार्थी ‘दीपावली पाडवा व लक्ष्मीपूजनाचा आनंद फटाके न वाजवता मिठाई वाटून साजरा करूया,’ अशा आशयाची पत्रे व्यापा-यांना पाठवितात.