दहावीला ९५ टक्क्यांपुढे असतील तरच नामांकित महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:14 AM2021-08-27T04:14:16+5:302021-08-27T04:14:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अकरावी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, येत्या शुक्रवारी विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश ...

Nominated colleges only if they are above 95% in 10th standard | दहावीला ९५ टक्क्यांपुढे असतील तरच नामांकित महाविद्यालय

दहावीला ९५ टक्क्यांपुढे असतील तरच नामांकित महाविद्यालय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अकरावी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, येत्या शुक्रवारी विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरी अंतर्गत गुणवत्तेनुसार महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता शहरातील नामांकित महाविद्यालयात ९५ टक्क्यांहून अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील ३११ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख ११ हजार २०५ जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले. मात्र, केवळ ७९ हजार २४६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली. त्यातील ७१ हजार ६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून ‘लॉक’ केला असून, ७० हजार ३४० विद्यार्थ्यांचा अर्ज तपासण्यात आला आहे. मात्र, पहिल्या फेरीसाठी केवळ ५९ हजार ८८९ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवले आहेत.

कोरोनामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल प्रसिद्ध करण्यात आला. परिणामी राज्यातील तब्बल ९१ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेशाचा कटऑफ निश्चितच वाढणार आहे. मागील वर्षी फर्ग्युसन, बीएमसीसीसारख्या नामांकित महाविद्यालयांचा पहिल्या फेरीचा कट-ऑफ ९७ ते ९८ टक्क्यांपर्यंत होता. त्यामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चौकट

“अकरावी प्रवेशाबाबत प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवारी सकाळी महाविद्यालयांची ॲलॉटमेंट यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ ते ३० ऑगस्ट या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. तसेच पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही तर, संबंधित विद्यार्थ्याला पुढील दोन प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी करून घेतले जाणार नाही.”

-मीना शेंडकर, सहाय्यक शिक्षण संचालक, पुणे विभागीय शिक्षण

Web Title: Nominated colleges only if they are above 95% in 10th standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.