टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही बिनविरोध करता का? चंद्रकांत पाटलांचे नाना पटोलेंना प्रत्यत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 01:43 PM2023-02-06T13:43:49+5:302023-02-06T13:44:08+5:30
भाजपकडून या निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली, ती टिळक परिवाराला देण्यात आली नसल्याची पटोले यांची टीका
पुणे: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेंबाची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम पक्ष महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंदकांत पाटील, बाळासाहेंबाची शिवसेनेेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. परंतु रॅलीला टिळक कुटुंबीयांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. तसेच नाना पटोले यांनी शैलेश टिळक यांना उमेदवारी नाकारल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांना प्रत्युत्तर देत स्पष्टीकरण दिले आहे.
ही पोटनिवडणूक बिनविरोध करायची नसल्यामुळे नाना पटोले असे म्हणतात की, टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती तर आम्ही बिनविरोधचा विचार केला असता. माझे नाना पटोलेंना आवाहन आहे, टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही बिनविरोध करता का?" असा सवाल पाटलांनी उपस्थित केला आहे. अजूनही २४ तास बाकी आहेत. आमच्या विधानाचा पटोले यांनी विचार करावा असेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. तर भाजपने चिंचवडमध्ये जगतापाच्या घरात उमेदवारी दिली आहे, त्याठिकाणी आघाडी उमेदवार देणार आहे, त्याचे काय? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
भाजप हा शिस्तबद्ध पक्ष
मुक्ता टिळक यांना गेल्या वेळेची पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले होते. तेव्हा मीसुद्धा उमेदवारी मागितली होती. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याने आमच्याकडे नाराजीची भाषा चालत नाही. विरोधात कोणीही असो कसाही प्रचार करो, भाजप आणि मित्र पक्षांच्या बळावर आम्ही विजय मिळवणारच आहोत. असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे.
सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही
भाजपकडून या निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली, ती टिळक परिवाराला देण्यात आली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिला होता तो जो प्रस्तावाला आता अर्थ राहिला नाही. सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली होती.