माजी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:37 AM2024-05-17T10:37:04+5:302024-05-17T10:37:22+5:30
पुणे : सदनिका बुक केल्यानंतर कंपनीने ना करार केला, ना बांधकाम सुरू केले. त्यामुळे बुकिंगसाठी दिलेली रक्कम नऊ टक्के ...
पुणे : सदनिका बुक केल्यानंतर कंपनीने ना करार केला, ना बांधकाम सुरू केले. त्यामुळे बुकिंगसाठी दिलेली रक्कम नऊ टक्के व्याजासह परत करावा, असा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला होता. या आदेशाची पूर्तता न केल्याप्रकरणी संजय काकडे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे.
राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष राम सूरत राम मौर्य आणि सदस्य भरतकुमार पांडे यांनी हा निकाल दिला. कोथरूड येथील अनघा आंबेतकर यांनी याबाबत ‘काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड’विरोधात तक्रार दिली होती. तक्रारदाराने काकडे यांच्या कोथरूड बाग या गृहप्रकल्पात २०१५ मध्ये निवासी सदनिका बुक केली होती. ९९ लाख ७३ हजार रुपये किमतीच्या या सदनिकेसाठी त्यांनी १० नोव्हेंबर २०१५ पासून कंपनीला वेळोवेळी रुपये २१ लाख ३४ हजार ८१ रुपये दिले होते. मात्र सदनिकेच्या खरेदीबाबत कंपनीने त्यांच्याशी करार केला नाही. तसेच ठरल्याप्रमाणे बांधकामदेखील सुरू केले नाही. त्यामुळे आंबेतकर यांनी जून २०१७ मध्ये बुकिंग रद्द करीत पैसे परत देण्याची मागणी केली.
त्यानुसार कंपनीने त्यावेळी त्यांना पाच लाख रुपये परत केले. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी आयोगात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होत तक्रारदार यांचे १६ लाख ३४ हजार ८१ रुपये बुकिंग केल्याच्या तारखेपासून नऊ टक्के व्याजाने परत करावेत. तक्रार खर्चापोटी ५० हजार रुपये द्यावेत, असा आदेश फेब्रुवारी २०२३ मध्ये राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला होता.
पैसे न मिळाल्याने तक्रारदार यांनी ॲड. ज्ञानराज संत यांच्यामार्फत आयोगात अर्ज करत आदेशाची पूर्तता करण्याची मागणी केली होती. निकाल होऊन एक वर्ष उलटले आहे. आदेशाची पूर्तता करण्यासाठी तीनदा संधी दिली. तरीही आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात यावे, असा युक्तिवाद ॲड. संत यांनी केला. त्यानुसार हे वॉरंट काढण्यात आले आहे.